कोल्हापुरात शालेय मुलांकडून रॅगिंग; मित्राकडूनच उकळले ४० हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:38 IST2025-01-07T11:37:36+5:302025-01-07T11:38:03+5:30
कोल्हापूर : क्रशर चौकातील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा मुलांनी वर्गातीलच एका मित्राचे रॅगिंग करून त्याच्याकडून वेळोवेळी ...

कोल्हापुरात शालेय मुलांकडून रॅगिंग; मित्राकडूनच उकळले ४० हजार रुपये
कोल्हापूर : क्रशर चौकातील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा मुलांनी वर्गातीलच एका मित्राचे रॅगिंग करून त्याच्याकडून वेळोवेळी सुमारे ४० हजार रुपये उकळले. हा प्रकार गेल्या तीन-चार महिन्यांत घडला. मित्रांच्या दबावातून घाबरलेल्या मुलाने घरातून बोरमाळ चोरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक प्रकाराने पालकांसह पोलिसही चक्रावले.
मूळचे चंदगड तालुक्यातील एक कुटुंब कोल्हापूर शहरात राहते. त्यांचा मुलगा क्रशर चौकातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती बरी असल्याने त्याच्याकडे नेहमी थोडेफार पैसे असतात. हीच बाब लक्षात घेऊन वर्गातील काही मित्रांनी त्याला घेरले. सुरुवातीला गोड बोलून त्याच्याकडून पैसे उकळले. नंतर त्याला भीती घालून आणि धमकावून पैसे काढण्यास सुरुवात झाली.
अनेकदा घरातील मोबाइलच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून त्यांनी पैशांची मागणी केली आहे. घाबरलेला मुलगा घरातील पैसे चोरून मित्रांना देत होता. मित्रांच्या आग्रहातून त्याने घरातील बोरमाळ चोरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलाच्या पालकांनी शाळेत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण जुना राजवाडा पोलिसांपर्यंत पोहोचले.
मौजमजेसाठी खर्च
वेळोवेळी मिळालेल्या पैशातून मुलांनी पिझ्झा, बर्गर पार्ट्या केल्या. कोल्ड्रिंक आणि फास्ट फूडवर त्यांनी पैसे खर्च केले. विशेष म्हणजे, यातील बहुतांश मुले बऱ्या घरची आहेत. त्यांना कुठलेही व्यसन नाही. अभ्यासात बरी आहेत. त्यांनी ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळल्याचे पालकांना सुरुवातीला पटले नाही. अखेर मुलांनी कबुली दिल्यानंतर पालकांना धक्का बसला.
शाळेकडून मुलांना समज
हा गंभीर प्रकार उघडकीस येताच शाळेतील शिक्षकांनी सर्व मुलांना समज देऊन आठ दिवसांसाठी शाळेत न येण्याची शिक्षा केली. पालकांना बोलावून हा प्रकार परस्पर मिटविण्याचा सल्ला दिला.