कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:09 IST2025-03-04T12:08:24+5:302025-03-04T12:09:00+5:30

उल्हास पाटील, संजय घाटगे यांचाही भाजप प्रवेश निश्चित  

Radhanagari Former MLA K. P. Patil from to join NCP | कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; ‘के. पीं’नी शिवबंधन तोडले, ‘घड्याळ’ बांधणार

कोल्हापूर : ‘राधानगरी’चे माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील हे लवकरच स्वगृही परतणार आहेत. उद्धवसेनेचे माजी आमदार व विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’च्या छावणीत गेलेले उल्हास पाटील यांच्यासह माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून हा पक्षाला मोठा झटका मानला जात आहे.

के. पी. पाटील व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना अनेक वर्षांचा आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या पडत्या काळात के. पी. पाटील व ए. वाय. पाटील हे मेहुणे-पाहुणे त्यांच्या मागे उभे राहिले. के. पी. पाटील हे एकदा अपक्ष तर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार झाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ‘राधानगरी’ मतदारसंघ शिंदेसेनेला गेल्याने त्यांची कोंडी झाली होती. ते काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास तयार होते, पण महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेला गेल्याने अखेरच्या क्षणी त्यांनी शिवबंधन बांधले. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यांच्या रूपाने सहकारातील तगडा नेता पक्षासोबत आल्याने पक्षाची ग्रामीण भागातील मुळे घट्ट होतील, अशी अपेक्षा पक्षनेतृत्वासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना होती.

पण, विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. पहिल्यांदा राधानगरी व भुदरगड तालुक्यातील त्यांचे शिलेदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना पाठवण्यास सुरुवात केली. रविवारच्या पक्षनोंदणी प्रारंभासाठी पाटील यांचे सुपुत्र, ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी उपस्थिती लावत शिवबंधनांची गाठ तोडून पुन्हा हातात घड्याळ बांधले.
शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे, उल्हास पाटील हे राहिले. पण, विधानसभा निवडणुकीत डॉ. मिणचेकर व पाटील यांनी स्वाभिमानी संघटनेकडून निवडणूक लढवली. यामध्ये दोघांनाही अपयश आले. डॉ. मिणचेकर यांनी शिंदेसेनेचा मार्ग धरला, पण उल्हास पाटील यांची अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यामुळे गोची झाल्याने त्यांनी भाजपचा मार्ग धरला आहे.

‘उद्धवसेने’च्या अस्तित्वासमोर प्रश्न

एकसंध शिवसेनेचे दोन खासदार, सहा आमदार, दहा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्याशिवाय एकही ताकदवान नेता उद्धवसेनेत न राहिल्याने अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘ए. वाय.’ यांचे वेट ॲन्ड वॉच

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘चिमण्यांनो परत फिरा’ अशी हाक दिली असून बहुतांशी परतीच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषदेचे दोन आकडी सदस्य संख्या करायची झाल्यास मातब्बरांना पक्षात घेणे गरजेचे आहे, हे ओळखूनच जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचीही मनधरणी सुरू आहे. पण, सध्या त्यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

Web Title: Radhanagari Former MLA K. P. Patil from to join NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.