'अधिकाऱ्यांपेक्षा दगड बरा' म्हणत दगडांची पूजा करत नोंदविला निषेध, कोल्हापूर महापालिकेत अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:39 IST2025-07-15T19:38:59+5:302025-07-15T19:39:19+5:30
कोल्हापूर नेक्स्टच्या कार्यकर्त्यांचा प्रश्नांचा भडिमार

'अधिकाऱ्यांपेक्षा दगड बरा' म्हणत दगडांची पूजा करत नोंदविला निषेध, कोल्हापूर महापालिकेत अनोखे आंदोलन
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराविरोधात सातत्याने पाठपुरावा करूनही काहीच कारवाई होत नसल्याने ‘अधिकाऱ्यांपेक्षा दगड बरा’ असे म्हणत कोल्हापूर नेक्स्टच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांच्या समोरच दगडांची पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
महानगरपालिकेत सुमारे दाेन तासांहून अधिक काळ झालेल्या महा जनसुनावणीत नागरिकांनी बेकायदेशीर बांधकामे, पार्किंगमधील अतिक्रमणे, आणि प्रलंबित तक्रारींबाबत प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देण्यात अपयश आल्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटला. कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या.
सर्व प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या समोरच दगडाची हळद-कुंकू आणि हार घालून पूजा केली. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने दगड बाजूला केले. त्यानंतर माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी, “आज आम्ही तुमचा प्रतीकात्मक निषेध केला आहे. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कारवाई झाली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र संतापास तुम्हाला सामोरे जावे लागेल.” असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.
नगररचना सहायक संचालक विनय झगडे आणि सहायक नगररचनाकार एन. एस. पाटील यांनी तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिले.
पाचवा मजला बेकायदेशीर, सहाव्या मजल्याला परवानगी कशी?
प्रद्माकर कुलकर्णी यांनी पाचवा मजला बेकायदेशीर ठरवल्यानंतर सहाव्या मजल्याला कशी परवानगी देता, असा सवाल केला. शेफाली मेहता यांनी पार्किंगमधील विनापरवाना बांधकामांची जंत्रीच वाचून दाखवली. प्रसाद पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीवर कारवाई न झाल्यामुळे चार मजली इमारत बांधल्या गेल्याचे निदर्शनास आणून दिले.
अस्लम जमादार यांनी महापालिकेच्या जागेवर बांधल्या जात असलेल्या इमारतीबद्दल तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊनही कारवाई न झाल्याचे सांगून संताप व्यक्त केला. यशवंत माने, ओंकार गोसावी, मिथुन मगदूम, गणेश राणे, शुभम महेकर, सुहास गुरव, उदय पाटील यांनीही आपल्या तक्रारींबद्दल अधिकाऱ्यांना अवगत केले.