पीएच.डी. करायचीय, मग किती पैसे देणार ते सांगा; गाईडकडूनच होतेय मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:09 IST2025-08-16T12:08:54+5:302025-08-16T12:09:26+5:30

संशोधक विद्यार्थी झाले त्रस्त

Professor Guide who guides Ph.D. students demands money directly from research students | पीएच.डी. करायचीय, मग किती पैसे देणार ते सांगा; गाईडकडूनच होतेय मागणी 

पीएच.डी. करायचीय, मग किती पैसे देणार ते सांगा; गाईडकडूनच होतेय मागणी 

कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संशोधन करून देशाच्या विकासात हातभार लावावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे सरकारचेच मानधन घेऊन पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक गाईडच संशोधक विद्यार्थ्यांकडून थेट पैशाची मागणी करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर शहरातील महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने संशोधक विद्यार्थ्याकडे अशी पैशाची मागणी केल्याने सरकार संशोधनाला चालना देत आहे की पात्रता नसलेल्यांना गाईडशिप देऊन प्राध्यापकांची घरे भरत आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

फेलोशिपवर डोळा

पीएच.डी. करताना सारथी, महाज्योती, बार्टी या संस्थांकडून विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपवर काही गाईडचा डोळा असतो. अनेक गाईड फेलोशिपमधील ठरावीक रक्कम प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांकडून घेत असल्याच्या तक्रारी आहेत. जर ही रक्कम दिली नाही तर प्रबंधात चुका दाखवून त्यांना त्रास दिला जात आहे.

प्राध्यापक-संशोधक विद्यार्थ्यामधील संवाद
प्राध्यापक
: काय झालं माझ्या कामाचं?
विद्यार्थी: सर काय झालंय, पेमेंटची जुळणी होईना झालीय, माझ्याकडे दहा हजार आहेत, पाठवू काय. त्यात फेलोशिपचे पेमेंटही येईना झालंय. चार-पाच दिवस थांबणार का?
प्राध्यापक : मला सोमवारी लागणार आहेत रे, भरायचे आहेत.
विद्यार्थी: मी बघितले एक-दोन जणांना विचारून. त्यांच्याकडे नाहीत, आता पावसाळ्यामुळे नाहीत. त्यात दवाखान्यामुळे सगळे पैसे संपलेत.
प्राध्यापक : निम्मे अर्धे तरी ॲडजेस्ट कर, ते तर व्हतंय का?
विद्यार्थी : किती?
प्राध्यापक : २५
विद्यार्थी : २५ व्हंय, बघतो संध्याकाळी, करतो.
प्राध्यापक : आठवणीनं कर मात्र.

पी.एच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांकडून गाइड जर असे काही आर्थिक देवाण-घेवाण करत असतील तर ते गंभीर आहे. अशी प्रकरणे सिद्ध झाली तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही. त्यांची गाइडशिप काढून घेतली जाईल. याबाबत संशोधक विद्यार्थ्यांनीही पुढे येऊन तक्रारी कराव्यात. - डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

Web Title: Professor Guide who guides Ph.D. students demands money directly from research students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.