Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:20 IST2025-10-25T16:06:09+5:302025-10-25T16:20:30+5:30
राजकीय पक्षांचा बी प्लॅन तयार

Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची वेळ जसजशी जवळ येईल तसे महायुती व महाविकास आघाडीकडून स्वबळाचे नगारे वाजविले जाऊ लागले आहेत. अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेणार असले तरी स्थानिक पातळीवर मात्र प्रभागांनिहाय इलेक्टीव्ह मेरिट असलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांची यादी करण्यावर भर दिला जात आहे. निवडणूक वेगवेगळी लढून नंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा ‘कोल्हापूर पॅटर्न’ नवा नसल्याने सर्वच पक्ष बी प्लॅनदेखील तयार करताना दिसत आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या २००५ पासूनच्या सर्वच निवडणुका वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढविल्या आहेत. निवडणूक निकाल लागल्यानंतर सोयीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करून एक वेगळा पॅटर्न तयार केला होता. नंतर हाच पॅटर्न महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपला धक्का देण्याच्या हेतूने राज्य सरकार बनविताना काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांनी राबविला होता आणि तो यशस्वीही झाला होता.
राज्यात २०२० ते २०२३ या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांची विभागणी झाली. २०२४ च्या राज्यातील निवडणुकीत भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची महायुती तर काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी झाली. विधानसभेत महायुतीने बाजी मारली. सत्ता स्थापन केली. त्यानंतर महायुती अधिक मजबूत झाली. अनेकांनी महायुतीतील पक्षात प्रवेश केले. पण आता हेच पक्षप्रवेश डोकेदुखी झाली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार, शिंदेसेनेत रस्सीखेच
सध्या राज्यात आणि केंद्रात महायुती सत्तेत असल्याने भाजप, शिंदे सेने, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ज्या पद्धतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिकेत भाजप, शिंदे सेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे तशीच रस्सीखेच अन्य महानगरपालिकेत सुरू झाली आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवर कोल्हापूर महानगरपालिकेसाठीही ती होऊ लागली आहे. यात शिंदेसेनेने आघाडी घेतली आहे. चाळीसहून अधिक माजी नगरसेवकांना शिंदे सेनेने आपल्या पक्षात घेतले. पाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही तयारी सुरू केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे ६५ इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार, उद्धवसेनेत चढाओढ कमी
काँग्रेस, उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारी मागण्यात तितकी चढाओढ दिसत नाही. काँग्रेसकडून ४० ते ५० उमेदवारांची यादी तयार केली आहे. परंतु अन्य दोन पक्षांची तेवढी ताकद नसल्याने आमदार सतेज पाटील सांगतील त्याप्रमाणे जागा वाटप, उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते.
सगळेच स्वतंत्र लढल्यास ....
- पक्षातील इच्छुकांना न्याय देणे शक्य
- बंडखोरीचा धोका कमी होईल
- पक्षनेतृत्वाला निवडणुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य
- पक्षाचे चिन्ह, धोरण घरोघरी पोहोचविता येईल