अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

By सचिन भोसले | Published: October 8, 2023 02:26 PM2023-10-08T14:26:41+5:302023-10-08T14:27:06+5:30

चारही दरवाजांची स्वच्छता, देवीच्या खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर यांनी रविवारी सकाळी १० च्या सुमारास देवीचे दागिने स्वच्छतेसाठी दिले

Preparations for Sharadiya Navratri Festival in Kolhapur's Ambabai Temple are in full swing | अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

googlenewsNext

कोल्हापूर : अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाची तयारीला वेग आला आहे. यानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या नित्य अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसरातील देवस्थानच्या कार्यालयात रविवारी दुपारी सुवर्ण कारागीरांनी अलंकाराची स्वच्छता केली.

देवीच्या खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर यांनी रविवारी सकाळी १० च्या सुमारास देवीचे दागिने स्वच्छतेसाठी दिले. यंदा गरूड मंडपाच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने कार्यालयाच्या मागील खोलीत ही स्वच्छता सुरु करण्यात आली. यात सर्व प्रथम नित्य वापरातील दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यात कवड्याची माळ, सोन्याचा चंद्रहार, मोहनमाळ, मोहरांची , पुतळ्याची माळ, ठुशी, म्हाळुंग फळ, नथ, मोरपक्षी, कुंडल या दागिन्याचे समावेश आहे. रिठ्याच्या पाण्यात दागिने स्वच्छ धुण्यात आले. तर जडावाच्या किरीट, जडावाचे कुंडल, चिंचपेटी, लप्पा, सातपदरी, कंठी, बाजूबंद, मोत्याची माळ, पान, देवीचे मंगळसूत्र आदीलशाही, संस्थानकालीन दागिन्यांसह एका भाविकाने नव्याने दिलेल्या किरीटाचाही समावेश होता.

नवरात्र आणि नित्य अलंकार पूजा बांधण्यापुर्वी खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर हे दुपारी बारा वाजता सोन्याचे अलंकार श्रीपूजकांना देतात. त्यानंतर रात्री पूजा उतरल्यानंतर ते दागिने परत घेतात. पितळी उबंऱ्याच्या गाभाऱ्यात हे दागिने ठेवण्याची खजिन्याची खोली आहे. तेथे हे पुन्हा ठेवले जातात.उत्सव, सणाच्या काळात श्रीपूजकांच्या मागणीप्रमाणे हे नित्य वापरातील दागिने खांडेकर हे उपलब्ध करून देतात. या देवाण-घेवाणाची नोंद केली जाते. खांडेकर कुटूंबियांची ही अकरावी पिढी आहे. दरम्यान परिसर स्वच्छतेबरोबरच महाद्वारसह चारही दरवाजांची बूमद्वारे पाणी मारून स्वच्छता करण्यात आली.

Web Title: Preparations for Sharadiya Navratri Festival in Kolhapur's Ambabai Temple are in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.