Kolhapur: अंबाबाई नवरात्रोत्सवाची तयारी सुरु, मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:51 IST2025-09-10T17:50:09+5:302025-09-10T17:51:15+5:30
गरुड मंडप उभारणीला वेग

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : गणेशोत्सव संपतो न संपतो, तोच आता करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रोत्सवाला आता पंधरा दिवस राहिल्याने मंगळवारपासून मंदिराच्या शिखरांच्या रंगरंगोटीला सुरुवात झाली. यासह मंदिराच्या छतावर, संरक्षण भिंतींसह दगडी बांधकामावरील झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. आज, बुधवारपासून परिसराची स्वच्छता केली जाणार आहे.
गणेशोत्सव संपताच, सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. त्यात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठाताली देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी या काळात २० लाखांवर भाविक येतात. यंदा २२ तारखेला घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने उत्सवाची तयारी सुरू झाली आहे.
मंगळवारपासून मंदिराच्या शिखरांचे घासकाम करून पाचही शिखरांची रंगरंगोटी करण्यात आली, तसेच मंदिराच्या छतावर उगवलेल्या झाडा-झुडपांचीही स्वच्छता करण्यात आली. आता बुधवारपासून संपूर्ण मंदिराची पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छता केली जाणार आहे, तसेच परिसरातील अन्य मंदिरांचीही स्वच्छता येत्या आठवड्यात केली जाणार आहे.
गरुड मंडप उभारणीला वेग
अंबाबाई मंदिर परिसरात सध्या गरुड मंडप, नगारखाना आणि मणिकर्णिका कुंडाचे काम सुरू आहे. नवरात्रोत्सवात देवीचे धार्मिक विधी गरुड मंडपात केले जातात. त्यासाठी वेगाने गरुड मंडपाचे खांब व त्यावरील अडक बसविले जात आहेत. हा ढाचा तयार झाला की, त्याचा नवरात्रोत्सवासाठी तात्पुरता वापर करता येणार आहे. त्यामुळे गरुड मंडपाच्या कामाला वेग आला आहे. पुढील आठवड्यात रात्रंदिवस काम करून हे स्ट्रक्चर उभारण्याचे देवस्थानचे नियोजन आहे.