Kolhapuri Chappal: दिलदार नाही ‘प्राडा’, म्हणून सोशल मीडियावर राडा; कोल्हापूर पायताणावरुन घमासान - Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:22 IST2025-06-26T13:22:20+5:302025-06-26T13:22:37+5:30
Prada's Kolhapuri Chappal Row: चप्पल कोल्हापुरी, मात्र कारागिरांना श्रेयाचे सौजन्यही नाही

Kolhapuri Chappal: दिलदार नाही ‘प्राडा’, म्हणून सोशल मीडियावर राडा; कोल्हापूर पायताणावरुन घमासान - Video
कोल्हापूर : ‘प्राडा स्प्रिंग समर २०२६’ हा मिलान येथील शो सध्या चर्चेत आला आहे. या ठिकाणी कलाकारांनी रॅम्पवर चालताना कोल्हापुरी चप्पलसारखी पादत्राणे वापरली आहेत. परंतु, या कंपनीने याचे किमान श्रेय तरी कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना द्यायला हवे होते, असा सूर समाजमाध्यमावर उमटला आहे. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलला जीआय मानांकन मिळाले असताना असे कसे होऊ शकते, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
या शोमधील अनेक मॉडेल्सनी कोल्हापुरी चप्पलशी साधर्म्य असलेली पादत्राणे वापरली आहेत. त्यांनी या चप्पलचा उल्लेख ‘सँडल्स’ असा केला आहे. परंतु, हे चप्पल पाहिल्यानंतर कोल्हापुरीशी हे तंताेतंत जुळत असल्याचे चटकन जाणवते. परंतु, या शोदरम्यान कुठेही या चप्पलचा कोल्हापुरी चप्पल म्हणून किंवा कारागिरांचा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे समाजमाध्यमावर ‘प्राडा’ कंपनीला रोषाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कंपनीनेही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
चप्पलला टी आकाराचा पट्टा, अंगठा, वादी, कान ही रचना कोल्हापूरची आहे. त्यामुळे या शोमध्ये वापरण्यात आलेली चप्पल ही कोल्हापुरीच म्हणावी लागतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर असे सादरीकरण होत असताना किमान कोल्हापूरचा आणि या कारागिरांचा उल्लेख व्हायला हवा होता. - सुभाष सातपुते, चप्पल व्यावसायिक