युद्धामुळे गॅस सिलिंडरची आयात थांबली, कोल्हापुरात हॉटेलमधून बटाटा वडा, भजी गायब झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:27 IST2026-03-11T18:26:37+5:302026-03-11T18:27:57+5:30

हॉटेल, रॅस्टॉरंट ऑक्सिजनवर : कसाबसा दोन दिवस पुरेल एवढाच साठा

Potato vada, bhajis disappear from hotels in Kolhapur due to gas cylinder shortage | युद्धामुळे गॅस सिलिंडरची आयात थांबली, कोल्हापुरात हॉटेलमधून बटाटा वडा, भजी गायब झाली

संग्रहित छाया

कोल्हापूर : आखाती देशातील युद्धामुळे कोल्हापुरातील हॉटेल, रेस्टॉरंटमधून बटाटा वडा, भजी, तळणीचे पदार्थ, डोसा, चायनीज असे खूप जास्त गॅस लागणारे पदार्थ गायब झाले आहेत. गॅस सिलिंडर पुरवून पुरवून वापरण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी हाय फ्लेम (खूप जास्त गॅस) लागणारे पदार्थ बंद करून कमी गॅसवर होणारे पदार्थ व साध्या जेवणावर भर दिला आहे. तसेच हॉटेलची वेळही कमी केली आहे. हॉटेल व्यावसायिकांकडे फक्त दोन दिवस पुरेल एवढा गॅस सिलिंडरचा साठा आहे त्यानंतर व्यवसाय बंदच ठेवावा लागणार आहे.

युद्धामुळे गॅस सिलिंडरची आयात थांबली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता फक्त घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरला प्राधान्य दिले असून व्यावसायिक व औद्योगिक कारणांसाठी वापरला जाणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत आला आहे. गेल्या काही वर्षात गॅसचा पुरवठा नियमित होत असल्याने व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा करत नाहीत. शिवाय ज्वलनशिल पदार्थ असल्याने ते धोक्याचे असते. सध्या शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडे फक्त दोन दिवस पुरेल एवढा गॅस सिलिंडरचा साठा आहे. त्यानंतर हॉटेल बंद ठेवावे लागणार आहे.

दुपारी १ ते ४ हॉटेल बंदच

हॉटेल किमान थोड्या फार प्रमाणात सुरू राहावे यासाठी व्यावसायिकांनी खूप गॅस लागणारे जसे की बटाटे वडा, भजी, डोसा, उत्ताप्पा, चायनीज असे पदार्थ बनवणे बंद केले आहे. त्याऐवजी एकदा बनवून ठेवता येतील असे शिरा, उप्पीट, पोहे सारखे पदार्थ आणि साधे जेवण बनवले जात आहे. हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ कमी केली आहे. दुपारी १ ते ४ हॉटेल बंद ठेवले जात आहेत.

पर्यटक, भाविकांची अडचण

हॉटेल बंद ठेवावे लागल्याने भाविक, पर्यटकांची मोठी अडचण होणार आहे. शहरात अगदी लहान गाड्यावरील बटाटे वडापासून ते मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत सगळीकडे उत्तम चवीचे दर्जेदार पदार्थ मिळतात. पण गॅस सिलिंडर मिळाले नाही तर पर्यटकांचे कसे होणार, हा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे.

पुरवठा सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

मंगळवारी हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन काही प्रमाणात का असेना रेशनिंग पद्धतीने व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा व्हावा, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय केंद्र शासनाचा असून संपूर्ण देशभर अशीच परिस्थिती आहे. उपलब्ध गॅसचा जपून वापर करावा, केंद्राकडून पुढील सूचना येईपर्यंत सध्या प्रतीक्षा करावी लागेल असे स्पष्ट केले. यावेळी सचिन शानभाग, सिद्धार्थ लाटकर, अरुण चोपदार, आशिष रायबागे, जयंत पुरेकर यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

गॅस, पाणी आणि वीज हे हॉटेल व्यवसायासाठी अत्यावश्यक आहे. आता गॅस सिलिंडर नसल्याने पदार्थ बनवण्यावर मर्यादा आले आहेत. गाड्यांवरून खाद्यपदार्थांची विक्री करणारे अडचणीत येणार आहे. त्यामुळे कमी प्रमाणात का असेना गॅस पुरवठा व्हावा. - सिद्धार्थ लाटकर, सचिव, कोल्हापूर हॉटेल मालक संघ

तळायचे पदार्थ बंद करून साधा नाष्टा आणि जेवण तेवढे हॉटेलमध्ये ठेवले आहे. वेळ कमी केली आहे. दोन-तीन दिवसांनी काेरोनाप्रमाणे हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. - अरुण चोपदार, व्यावसायिक
 

हॉटेल व्यवसाय बंद करून कसे करायचे. टॅक्स, कामगारांचा पगार दैनंदिन खर्च कसा भागवणार असे अनेक प्रश्न आहेत. जेवढा गॅस शिल्लक आहे तेवढ्यात तग धरणे आणि नंतर व्यवसाय बंद करणे एवढाच पर्याय राहिला आहे. पर्यटकांना आता घरुनच भाजी भाकरीची शिदोरी घेऊन कोल्हापुरात यावे लागेल. कोरोना सारखी स्थिती होणार आहे. - सचिन शानभाग, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ

Web Title : युद्ध से गैस आयात बाधित; कोल्हापुर होटलों से वड़ा, भजी गायब।

Web Summary : युद्ध के कारण गैस सिलेंडर की कमी से कोल्हापुर के होटल बंद होने के कगार पर हैं। वड़ा और भजी जैसे लोकप्रिय नाश्ते अनुपलब्ध हैं। होटल मालिकों ने अधिकारियों से राशनिंग का अनुरोध किया।

Web Title : War halts gas import; Kolhapur hotels axe vada, bhaji.

Web Summary : Kolhapur hotels face closure due to gas cylinder shortage from war. Popular snacks like vada and bhaji are unavailable. Hoteliers request rationing from authorities.