राजकीय नेत्यांना शाहू समाधीस्थळी पाय ठेवू देणार नाही, शाहूप्रेमींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:29 PM2023-04-25T12:29:47+5:302023-04-25T12:30:15+5:30

'इथं घोषणा द्यायच्या आणि वर्षभर दुसरंच काही तरी करायचं'

Political leaders will not be allowed to set foot on Shahu mausoleum in kolhapur, warns Shahu lovers | राजकीय नेत्यांना शाहू समाधीस्थळी पाय ठेवू देणार नाही, शाहूप्रेमींचा इशारा

राजकीय नेत्यांना शाहू समाधीस्थळी पाय ठेवू देणार नाही, शाहूप्रेमींचा इशारा

googlenewsNext

कोल्हापूर : शाहू जन्मस्थळाचे काम २००७ पासून रखडले आहे. समाधीस्थळाचा निधी महापालिका आणि समाजकल्याण खात्याच्या वादात अडकला आहे. शाहू मिलच्या ठिकाणी काहीच झालेले नाही. यातील काही कामांची पूर्तता, सुरुवात झाल्याशिवाय ६ मे रोजी राजकीय नेत्यांना शाहू समाधीस्थळी पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शाहूप्रेमींनी सोमवारी येथे दिला.

राजर्षी शाहू सलोखा समितीच्यावतीने ६ मे रोजी होणाऱ्या शाहू महाराज स्मृती शताब्दी समारोप कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नर्सरी बागेत बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते.

यावेळी निमंत्रक वसंतराव मुळीक म्हणाले, यानिमित्ताने प्रदर्शन, जिथे वेदोक्त प्रकरण घडले, त्या पंचगंगा घाटावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शासन काही करणार की नाही माहिती नाही. परंतू त्यांनी अजूनही १४ दिवस आहेत. काही तरी निर्णय घ्यावा. ६ मे रोजी या ठिकाणी शाहूसागर उसळला पाहिजे.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, तथाकथित स्वातंत्र्यवीराचे मुंबईत स्मारक झाले आहे. परंतू शाहू महाराजांचे स्मारक झाले नाही. त्या ठिकाणी स्मारक उभारल्याशिवाय आपण सर्वांनी स्वस्थ बसू नये. ‘आप’चे संदीप देसाई म्हणाले, शाहूंना अभिवादनासाठी काही मिनिटे स्तब्ध राहण्याचे आवाहन करूया. प्रशांत जाधव म्हणाले, कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे १०० चित्रकार शाहू महाराजांची चित्रे काढणार आहेत.

शिरीष देशपांडे यांनी शाहू मिलच्या विकासाची मागणी केली. यावेळी शुभम शिरहट्टी, टी. एस. कांबळे, मल्हार शिर्के, डॉ. जे. के. पवार यांच्यासह मान्यवरांनी सूचना केल्या. बैठकीला हारुण देसाई, सुंदर देसाई, दिलीप सावंत, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, कादर मलबारी, शैलजा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

शाहू विचारांना विरोध करणाऱ्यांना विरोध

यावेळी दिलीप पवार म्हणाले, शाहूंच्या विचारांना विरोध करण्याचा जे प्रयत्न करत आहेत, त्यांना विरोध करण्याची भूमिका घेणाऱ्यांनीच या ठिकाणी यावेे. इथं घोषणा द्यायच्या आणि वर्षभर दुसरंच काही तरी करायचं, असं नको. पवार यांच्या या कानटोचणीला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
 

Web Title: Political leaders will not be allowed to set foot on Shahu mausoleum in kolhapur, warns Shahu lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.