बनावट नोटांची छपाई कोल्हापुरातील राजेंद्रनगरात, सारे प्रयोग झाले देवाभाईच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:40 IST2026-03-26T18:38:41+5:302026-03-26T18:40:02+5:30
एका कागदात तीन नोटा; प्रिंटर, कागद, कटर जप्त; रॅकेटचा उलगडा

बनावट नोटांची छपाई कोल्हापुरातील राजेंद्रनगरात, सारे प्रयोग झाले देवाभाईच्या घरात
कोल्हापूर : बनावट नोटांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीने राजेंद्रनगरातील देवाभाई उर्फ मोहन पवार (वय २५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याच्या घरात नोटांची छपाई केल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी देवाभाईला अटक केली असून, त्याच्या घरातून प्रिंटर, कागद, कटर जप्त केला. नोटांच्या कलर झेरॉक्स काढून छपाई केल्याची कबुली त्यांनी दिली.
राजर्षी शाहू महाराज टर्मिनस परिसरात बनावट नोटांची खरेदी-विक्री करणारे राहुल खिरुगडे आणि गुरू मेंगाणे या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर यांना नोटा पुरवणारा राहुल रसाळ हादेखील पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या चौकशीतून चौथा आरोपी देवाभाई उर्फ मोहन पवार याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी त्याला राजेंद्रनगरातून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वत:च्या घरात दोन महिन्यांपूर्वी दीड लाखांच्या नोटांची छपाई केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्या घरातून छपाईचे साहित्य जप्त केले. शहरातूनच त्यांनी कलर प्रिंटर, झेरॉक्सचे कागद, कटर खरेदी केले होते. दीड लाखातील १९ हजार रुपये रसाळ याने खपविण्यासाठी घेतले होते. त्यातील बहुतांश नोटा भिजून खराब झाल्याचे त्याने चौकशीत सांगितले. या टोळीतील चौघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिस उपनिरीक्षक सागर गुणवरे यांच्या पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला.
एका कागदात तीन नोटा
बनावट नोटांची छपाई करण्यासाठी आरोपींनी खऱ्या नोटांच्या कलर झेरॉक्स तयार केल्या. एफोर साईजच्या एका कागदात तीन नोटांची छपाई केली. नोटांच्या दोन्ही बाजूंची छपाई तंतोतंत यावी यासाठी त्यांनी खबरदारी घेतली. मात्र, झेरॉक्स पेपरचा वापर केल्याने त्या खपल्या नाहीत. पाण्यात भिजताच नोटांचा रंग उडाला, असे त्यांनीच पोलिसांना सांगितले.
झटपट श्रीमंतीसाठी बनावट नोटा
अटकेतील चौघेही मोलमजुरी करणारे आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी नोटांची छपाई करण्याचा फंडा खिरुगडे आणि मेंगाणे यांच्या डोक्यात आला. देवा भाईच्या मदतीने त्यांनी छपाई केली. मात्र, नोटा खपवण्यापूर्वीच ते पोलिसांच्या हाती लागले.
देवाभाईची दहशत
देवाभाई हा तृतीयपंथी आहे. ओळखीतून त्याची राहुल खिरुगडे याच्याशी मैत्री झाली होती. परिसरात दहशत असल्याने अटकेतील दोघे देवाभाईचे नाव घेण्यास घाबरत होते. तो करणी करेल अशी भीती मित्रांना वाटत होती, असे पोलिसांनी सांगितले.