Kolhapur: पुजाऱ्याला फसवणाऱ्या महिलेचा कोकणातही प्रताप, बनावट सोने तारण ठेवून बँकेतून घेतले कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:49 IST2025-06-06T15:47:40+5:302025-06-06T15:49:18+5:30

तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी तिच्यासह पाच जणांवर चार दिवसांपूर्वीच शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

Police investigation revealed that Sneha Sanjay Narkar, who cheated the priest had cheated a bank in Konkan along with four accomplices | Kolhapur: पुजाऱ्याला फसवणाऱ्या महिलेचा कोकणातही प्रताप, बनावट सोने तारण ठेवून बँकेतून घेतले कर्ज

Kolhapur: पुजाऱ्याला फसवणाऱ्या महिलेचा कोकणातही प्रताप, बनावट सोने तारण ठेवून बँकेतून घेतले कर्ज

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याची फसवणूक करणारी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिने चार साथीदारांसह कोकणात एका बँकेची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. बनावट सोने तारण ठेवून कर्ज काढल्याप्रकरणी तिच्यासह पाच जणांवर कुडाळ आणि वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. थकीत कर्जापोटी बँकांनी ओढून आणलेल्या कार कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिने अनेकांना गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले.

जयसिंगपूर येथील नितीन दिलीप जंगम (वय ४०) यांना स्नेहा नारकर हिने व्यवसाय वाढवण्यासाठी दीड कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच कमी किमतीत कार मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४३ लाख ७४ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. तिने केलेल्या इतर गुन्ह्यांची माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली. तिने दोन वर्षांपूर्वी कोकणातील एका बँकेत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यात तिच्या इतर चार साथीदारांचा सहभाग होता.

तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी तिच्यासह पाच जणांवर चार दिवसांपूर्वीच शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शुक्रवारी (दि. ६) तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

तक्रारी देण्याचे आवाहन

थकीत कर्जापोटी बँकांनी ओढून आणलेल्या महागड्या कार कमी पैशात मिळवून देण्याचे आमिष दाखवून नारकर हिने अनेकांना गंडा घातला आहे. पैसे परत मिळावेत यासाठी त्यांनी तगादा लावताच नितीन जंगम यांची फसवणूक करून ४३ लाख ७४ हजार रुपये उकळल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी केले आहे.

Web Title: Police investigation revealed that Sneha Sanjay Narkar, who cheated the priest had cheated a bank in Konkan along with four accomplices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.