Kolhapur Crime: चोरांच्या नाना तऱ्हा... कोणी नोटा परत ठेवतो, कोणी जेवून जातो; पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:34 IST2025-10-29T17:34:34+5:302025-10-29T17:34:56+5:30
आचंबित होण्याइतका सराईतपणा; डीव्हीआरसह पुरावेही गायब, करुन जातात घाण

Kolhapur Crime: चोरांच्या नाना तऱ्हा... कोणी नोटा परत ठेवतो, कोणी जेवून जातो; पोलिसही चक्रावले
कोल्हापूर : घरात सर्वांचा डोळा चुकवून धान्यांच्या डब्यात लपवून ठेवलेली रोकड असो, की कुलूपबंद अवजड तिजोरी असो. चोरट्यांना नेमकी जागा सापडते आणि काही क्षणात लाखोंचा किमती ऐवज लंपास होतो. चोरीचे दुष्कृत्य करतानाही काही चोरटे त्यांची वेगळी छाप सोडतात. त्यामुळे चोरट्यांच्या नाना तऱ्हांची चर्चा घरमालकांसह पोलिसांमध्येही रंगते.
चार दिवसांपूर्वी पाचगाव परिसरात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्याने एकही चांदीचा दागिना किंवा चांदीच्या वस्तूंना हात लावला नाही. चांदीचे कॉइन आणि सुट्टे पैसेही त्याने चोरले नाहीत. रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवरच त्याने डल्ला मारला. विशेष म्हणजे तिन्ही ठिकाणी त्याने रोकडमधील दहा रुपयांची एक नोट काढून परत ठेवली.
तिन्ही ठिकाणी देव्हाऱ्यावरील वस्तूंना, मूर्तींना धक्का लावला नाही. हॉलमध्ये चपला काढून तो देव्हाऱ्याकडे गेल्याचे पाऊल खुणांवरून दिसत आहे. कपाटांमधील साहित्यही फारसे विस्कटले नाही. शिवाय परत जाताना दरवाजे पूर्ववत बंद केले. फक्त सोने आणि रोकड चोरणाऱ्या चोरट्याला चांदीचा मोह झाला नसल्याने याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
डीव्हीआरसह पुरावेही गायब
अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. मात्र, त्याचा डीव्हीआर घरात दर्शनी भागातच असतो. अनेक चोरटे चोरी करून जाताना डीव्हीआर घेऊन जातात. काहीजण कॅमेऱ्यांवर रुमाल टाकतात. काही चोरटे मास्क घालून ओळख लपवतात.
हाताला लागेल ते लंपास
काही चोरटे हाताला लागेल ते लंपास करतात. पेठ वडगाव येथील कोल्हापूर रोडवर एका बंद हॉटेलमधील टीव्ही संच, गिझर, जनरेटर, गाद्या, झेरॉक्स मशीन अशा अनेक वस्तू टेम्पो भरून पळविल्या. ग्रामीण भागात दारातील भांडी, कपडे पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय असतात.
चोरीसह पोटपूजाही
काही चोरांना चोरीसोबतच पोटपूजा करण्याचा मोह आवरत नाही. स्वयंपाक घरातील डबे, फ्रीज उघडून चपाती-भाजी खाऊन चोरट्यांनी घरातील किमती ऐवजावर डल्ला मारल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हाताला काहीच न लागल्यास साहित्य विस्कटून किंवा घरातील वस्तूंचे नुकसान करून पळणारेही चोरटे अनेक ठिकाणी दिसतात.
घरात घाण करून जातात
काही चोरटे चोरी केल्यानंतर त्याच घरात लघुशंका किंवा शौच करतात. श्वान पथकाची दिशाभूल करण्यासाठी असे प्रकार केले जातात. पोलिसांना कोणताही सुगावा सापडू नये यासाठी चोरांकडून हॅण्डग्लोज, मास्क वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिस सांगतात.