Kolhapur: उत्तूर येथील चोरीचा उलगडा; चालकानेच कट रचून १३ लाख रुपये लंपास केले, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:34 IST2025-07-09T16:33:26+5:302025-07-09T16:34:41+5:30
रोकडसह मुद्देमाल जप्त

Kolhapur: उत्तूर येथील चोरीचा उलगडा; चालकानेच कट रचून १३ लाख रुपये लंपास केले, तिघांना अटक
कोल्हापूर : गोव्यातून इचलकरंजीकडे निघालेला टेम्पो जेवणासाठी उत्तूर (ता. आजरा) येथे थांबल्यानंतर टेम्पोच्या केबिनमधील साडेतेरा लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोघांसह त्यांच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. ८) इचलकरंजी येथे ही कारवाई केली. फिर्यादी रवी हणमंत माने यांच्या टेम्पोवरील चालकानेच कट रचून दोन साथीदारांसह चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले.
पैसे चोरणारा टेम्पोचालक शुभम रमेश भोसले (वय २७), अभिषेक नंदकुमार पोवार (२४, दोघे रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) आणि चोरीतील रोकड घरात ठेवून घेणारा ऋषिकेश सुभाष चौगुले (२७, रा. नारळ चौक, इचलकरंजी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील १३ लाख १५ हजार रुपये, दोन मोबाईल आणि दुचाकी असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने यांचे चार मालवाहतूक टेम्पो आहेत. यातील एका टेम्पोवर शुभम भोसले हा चालक म्हणून काम करीत होता. गोव्यातील हार्डवेअर विक्रेत्यांना विकलेल्या साहित्याचे पैसे त्याच टेम्पोतून आणले जातात आणि तो टेम्पो उत्तूर येथे जेवणासाठी थांबतो, याची माहिती भोसले याला होती.
त्याने टेम्पोतील रोकड चोरण्याचा कट रचला. त्यानुसार अभिषेक या मित्राला सोबत घेऊन २३ जूनच्या रात्री दहाच्या सुमारास उत्तूर येथील हॉटेलबाहेर पार्क केलेल्या टेम्पोच्या केबिनमधील १३ लाख ५० हजारांची रोकड लंपास केली. चोरलेली रक्कम त्यांनी इचलकरंजीतील मित्र ऋषिकेश याच्या घरी लपवली होती.
यांनी लावला गुन्ह्याचा छडा
अंमलदार समीर कांबळे, प्रवीण पाटील आणि दीपक घोरपडे यांनी उत्तूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांची ओळख पटवली. त्यानंतर उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने इचलकरंजीतील नारळ चौकात सापळा रचून तिघांना अटक केली.
३५ हजार खर्च केले
भोसले याच्या दुचाकीचे हप्ते थकले होते. १५ हजार रुपये भरून त्याने दुचाकीचे कर्ज भागवले. २० हजार रुपये त्यांनी गोव्यातील कॅसिनो आणि हॉटेलमध्ये खर्च केले. उर्वरित १३ लाख १५ हजारांची रोकड वाटून घेण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागली. अधिक तपासासाठी यांचा ताबा आजरा पोलिसांकडे देण्यात आला.
भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार
अटकेतील शुभम भोसले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर इचलकरंजी पोलिस ठाण्यात मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या दोन वर्षांपासून फिर्यादी माने यांच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करीत होता. अभिषेक पोवार हातमागावर काम करतो, तर ऋषिकेश याचा टेम्पो असून, तो टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.