(नियोजित विषय) व्हाईट कॉलर गुन्हेगार मोकळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:57+5:302021-02-05T06:55:57+5:30

कोल्हापूर : सामान्य माणसांना जादा व्याजाच्या परताव्याचे अमिष दाखवून अनेक कंपन्या लाखो, करोडो रुपये मिळवून परागंदा झाल्या, काही संस्थात ...

(Planned Parenthood) White-collar criminals free | (नियोजित विषय) व्हाईट कॉलर गुन्हेगार मोकळेच

(नियोजित विषय) व्हाईट कॉलर गुन्हेगार मोकळेच

कोल्हापूर : सामान्य माणसांना जादा व्याजाच्या परताव्याचे अमिष दाखवून अनेक कंपन्या लाखो, करोडो रुपये मिळवून परागंदा झाल्या, काही संस्थात अपहार झाल्याच्या संशयाने त्याही संस्थांचे व्यवहार ‘लॉक’ केले. परिणामी, भूलभुलय्यामध्ये सामान्य माणूस सद्या अडकला, गुंतवलेले पैसे परत कधी मिळणार याचीच प्रतीक्षा करावी लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेमार्फत अशा सुमारे १६ गुन्ह्यांचा तपास सद्या संथ गतीने सुरू आहे. काही मोजके संशयित गजाआड केले असले तरीही या कंपन्यांमागे असणारे व्हाईट कॉलर गुन्हेगार मात्र मोकळेच आहेत.

काही महिन्यासाठी सुसज्य ऑफीस थाटायचे, गोड बोलणाऱ्या युवतींना पगारावर नेमून त्यांना काउंटरवर बसवायचे, मोठमोठ्या व्याजाचे अमिष दाखवायचे, भूलथापा लावून रकमा गुंतवणुक करून घ्यायच्या, काहींचे परतावा दाखवून आणखी मोठ्या गुंतवणुकदारांना फाशी पाडायचे अशीच काहींशी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात दिसते. पण काही महिन्यानंतर याच कंपन्या अथवा संस्थांचे प्रमुख गाशा गुंडाळून गायब होतात. मग सुरू होतात, गुंतवणूकदारांच्या तक्रारी, पोलीस तपास, न्यायालयीन प्रक्रिया... आर्थिक बाबीशी संलग्न विषय असल्याने या तपासाची सूत्र आर्थिक गुन्हे शाखेकडे जातात. २०१९-२० पासून आतापर्यंत जिल्ह्यात अशा १६ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. त्यापैकी ५ प्रकरणाचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. कंपन्यांच्या काही संचालक, एजंटांना गजाआड टाकले जाते, संशयितांच्या मालमत्ता शोधून ती न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तही होतात. पण या कंपन्या व संस्थांच्या पाठीराखे करणारे ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगार मोकळेच फिरत आहेत.

पण ‘आम्ही गुंतवलेले पैसे कधी मिळणार’ हाच गुंतवणूकदाराचा प्रश्न पोलीस खात्यासमोर उभा आहे.

कंपन्या, संस्थेत झाला अपहार

२०१९ पासून आतापर्यंत ‘व्हिजन ॲग्रो, मेकर ॲग्रो, सक्सेस लाईफ, लक्ष्मी नारायण पतसंस्था (रुई, हातकणंगले), जीआयसी फायनान्स, शिवम बँक (सांगली) आदी संस्थेमध्ये अपहार झाल्याच्या संशयावरून आर्थिक गुन्हे शाखा पोलीस तपास करत असून ते गुन्हेगारांच्या मागावर आहेत.

‘व्हिजन अग्रो’ची व्याप्ती मोठी

दोन वर्षातील सर्वात मोठी व्याप्ती असलेला घोटाळा म्हणून ‘व्हिजन ॲग्रो’कडे पाहिले जाते. कंपन्याचा मुख्य सूत्रधार विकास खुडे याच्यासह एकूण तीन संचालक अटक झाले. एकजण फरारी आहे. आतापर्यत संशयितांकडून २३ तोळे सोने, दोन चारचाकी आलिशान मोटार, दुचाकी, लॅपटॉप, कॉम्प्युटर असा सुमारे ३० लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून फसवणुकीच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध सुरू असून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोट...

गुंतवणूकदारांचा प्रश्न हा आर्थिक निगडित असल्याने संशयित सापडणे, त्यांची मालमता शोधणे, त्या न्यायालयीन परवानगीने जप्त करणे, त्याचा लिलाव करणे या प्रक्रियेसाठी वेळ लागतो. पण लिलावाद्वारे जमा होणाऱ्या रकमा ह्या न्यायालयाच्या परवानगीने गुंतवणूकदारांना देण्यात येतात. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.

Web Title: (Planned Parenthood) White-collar criminals free