Kolhapur: ‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका - प्रकाश बेलवाडे; कार्यकारी संचालक म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:53 IST2025-08-19T11:53:00+5:302025-08-19T11:53:26+5:30

२०२१-२२ आर्थिक वर्षात चुकीचा कारभाराचा आरोप

Petition filed in circuit bench against the management of Gokul Dudh Sangh | Kolhapur: ‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका - प्रकाश बेलवाडे; कार्यकारी संचालक म्हणाले..

Kolhapur: ‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात सर्किट बेंचमध्ये याचिका - प्रकाश बेलवाडे; कार्यकारी संचालक म्हणाले..

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात २०२१-२२ या आर्थिक वर्षांत अनेक खरेदीमध्ये बेकायदेशीरपणा असल्याचे चाचणी व विशेष लेखापरीक्षणात निदर्शनास आल्यानंतर संबंधित लेखापरीक्षकांनी कारवाई करणे अपेक्षित होते. पण, त्यांनी पाठीशी घातल्याने याविरोधात सर्किट बेंचमध्ये सोमवारी याचिका दाखल केली असून दोषींकडून वसुली करून संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केल्याची माहिती वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बेलवाडे म्हणाले, संचालक मंडळाने २०२१-२२ मध्ये दूध संस्था देण्यात येणाऱ्या गवत कांड्या खरेदी २५ पैशांऐवजी ४० पैशांनी केली आहे. ७ लाखांच्या देणग्या जिल्ह्यात दिल्या आहेत, दूध कॅन रिपेअरीचा ठेका जादा दराने दिला आहे. मुंबईतील ‘गोकुळ शॉपी’ ला सरसकट ३२ हजार रुपये सजावटीसाठी दिले आहेत. एका दूध संस्थेला वासाच्या दुधापोटी १ लाख रुपये दिले. कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटी रुपये खेळते भांडवल म्हणून दिले आहे. याविरोधात एका संचालकांनी दुग्ध विभागाकडे तक्रार केल्यानंतर चाचणी व विशेष लेखापरीक्षण झाले. पण, त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने न्यायालयात दाद मागितली.

कायद्याचे पालन करूनच ‘गोकुळ’चा कारभार : योगेश गोडबोले

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा कारभार कायद्याचे पालन करूनच सुरु असून, २०२१-२२ मध्ये झालेल्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार चौकशीला संघाने सर्व सहकार्य केल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी पत्रकातून दिली.

डॉ. गोडबोले म्हणाले, संघाच्या २०२१-२२ या वैधानिक लेखापरीक्षणाबाबत शासनाकडे तक्रार झाली होती, या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे अधिकारबाह्य आदेश दिले होते. याविरोधात संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संघाने चाचणी लेखापरीक्षणास पूर्ण सहकार्य करुन कायद्यातील तरतुदीनुसार सर्व पूर्तता करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार संघाने लेखापरीक्षणास सर्वतोपरी सहकार्य केले आहे.

कायद्याने अपेक्षित असलेली प्रत्येक बाब पूर्णत्वास नेण्यात आलेली असून, त्याबाबत शासनासही वेळोवेळी कळविण्यात आले आहे. संघ हा नेहमीच पारदर्शकतेच्या व कायद्याच्या चौकटीत राहून कारभार करत असून, कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही. ‘गोकुळ’ हा शेतकऱ्यांच्या हितासाठीच कार्यरत असून, पुढेही कायद्याचे व न्यायालयाचे सर्व निर्देश पाळत पारदर्शकतेने व उत्तरदायित्वाने कारभार केला जाईल, असे डॉ. गोडबोले यांनी म्हटले आहे.

Web Title: Petition filed in circuit bench against the management of Gokul Dudh Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.