असू दिव्यांग तरी.. चारचाकीने केला हजारो मैलांचा प्रवास; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाबमधील दिव्यांगांचे कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:02 IST2025-10-09T18:56:02+5:302025-10-09T19:02:09+5:30
गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट या दिव्यांग मेळाव्यात होणार सहभागी

असू दिव्यांग तरी.. चारचाकीने केला हजारो मैलांचा प्रवास; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाबमधील दिव्यांगांचे कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
कोल्हापूर : चालता येत नसले म्हणून काय झाले आम्ही कर्तृत्वाने स्वत:च्या पायावर उभे आहोत हा संदेश देत गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट या दिव्यांग मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चारचाकी वाहनाने निघालेल्या दिव्यांगांचे बुधवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वागत केले. उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातून आलेल्या कानपूरचे सुनील मंगल यांच्यासह वीर सिंग संधू, बलविंदर सिंग व सहकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला विनय कुमार मदन मोहन लोहिया कर्णबधिर विद्यालय, जिज्ञाशा मतिमंद शाळा, चेतना मतिमंद शाळा, स्वयं मतिमंद शाळा आणि हॅंडीकॅप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा या संस्थांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. ते त्या-त्या राज्यांतून प्रवास करीत पुणे-कोल्हापूर मार्गाने गोव्याकडे रवाना झाले. यावेळी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे उपस्थित होत्या.
पायाने अपंग असूनही या यात्रेकरूंनी चारचाकी वाहन चालवायला शिकून अधिकृत परवाने मिळविले आहेत. आता 'आम्ही पूर्णपणे स्वयंपूर्ण झालो' असे अभिमानाने सुनील मंगल यांनी यावेळी सांगितले. वीर सिंग संधू हे दिव्यांग क्रिकेटपटू म्हणून भारताकडून खेळतात.