कोल्हापुरातील तीन हजारांवर गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, निवडणुकीआधी होणार प्रतिबंधात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:02 IST2025-06-10T18:02:19+5:302025-06-10T18:02:41+5:30

याद्या तयार करण्याचे काम सुरू

Over three thousand criminals in Kolhapur are on the police radar, preventive action will be taken before the elections | कोल्हापुरातील तीन हजारांवर गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, निवडणुकीआधी होणार प्रतिबंधात्मक कारवाई

कोल्हापुरातील तीन हजारांवर गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, निवडणुकीआधी होणार प्रतिबंधात्मक कारवाई

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू होताच पोलिसही ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार आहेत. तसेच गंभीर गुन्ह्यांतील काही टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई होणार आहे. यासाठी सराईत गुन्हेगारांच्या याद्या तयार करून कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.

निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात पोलिसांनी जिल्ह्यातील अडीच हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. यात सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांसह यापूर्वी निवडणूक काळात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींचाही समावेश होता. याशिवाय अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारे विक्रेते, मटका आणि जुगाराचे अड्डे चालवणाऱ्या सराईतांचा समावेश होता. ही कारवाई आणखी व्यापक केली जाणार असून, गेल्या सहा महिन्यांत दाखल झालेल्या गुन्ह्यांतील व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.

शस्त्रे जप्तीच्या सूचना

जिल्ह्यात विनापरवाना शस्त्रांची संख्या मोठी आहे. निवडणूक काळात याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीआधीच विनापरवाना शस्त्रे जप्त करावीत, अशा सूचना अधीक्षकांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. विधानसभा निवडणूक काळातही पोलिसांनी शस्त्रांचा शोध घेऊन जप्तीची मोहीम राबवली होती.

चुरशीच्या निवडणुकीमुळे विशेष खबरदारी

राज्यासह स्थानिक पातळीवर राजकीय संदर्भ बदलले आहेत. आपलीच सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पुरेपूर प्रयत्न होण्याची शक्यता आहे. यातून टोकाची ईर्षा आणि चुरस निर्माण होण्याचा धोका आहे. हीच बाब लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेणार असल्याचे अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत ६७५ जणांवर कारवाई

विधानसभा निवडणुकीवेळी १५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या काळात पोलिसांनी ६७५ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली होती. त्यात अवैध व्यावसायिकांसह अंमली पदार्थ तस्करांचा समावेश होता. अटकेतील आरोपींकडून २ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळीही तशा कारवाया केल्या जाणार असल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट केले.

Web Title: Over three thousand criminals in Kolhapur are on the police radar, preventive action will be taken before the elections