..अन्यथा गोकुळचे दूध बंद करू, संस्थाचालकांचा इशारा; आयकर चुकवून शासनाबरोबर उत्पादकांनाही फसवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:04 IST2025-10-17T16:04:36+5:302025-10-17T16:04:55+5:30
मोर्चात ‘कागल’मधील आहेत ना?

..अन्यथा गोकुळचे दूध बंद करू, संस्थाचालकांचा इशारा; आयकर चुकवून शासनाबरोबर उत्पादकांनाही फसवल्याचा आरोप
कोल्हापूर : डिबेंचर कपातीवरून दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधींमध्ये असलेला असंतोष मोर्चाच्या माध्यमातून संचालकांनी पाहिला आहे. शुक्रवारी (दि. १७) सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संचालकांनी दिले आहे. डिबेंचरबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करावी लागेल, असा इशारा ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिला. संघाने आयकर चुकवून शासनाबरोबर दूध उत्पादकांनाही फसवल्याचा आरोप करत प्रसंगी दूध बंद आंदोलन करू, असा इशाराही संस्थाचालकांनी दिला.
संचालकांसोबत चर्चा करताना महाडिक म्हणाल्या, चुकीच्या कारभाराला संचालक मंडळाच्या सभेत लेखी विरोध दर्शवला आहे; पण डिबेंचर मंजुरीचे प्रोसेडिंग मला दिलेले नाही. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे व अजित नरके यांनी ठेवी व त्यावरील तरतूद सांगत असताना महाडिक म्हणाल्या, आम्हाला ताळेबंद जुळवायचा नाही. तुमच्या ताळेबंदाशी उत्पादकांचा काय संबंध? कपात का केली तेवढे सांगा? ‘वारणा’ दूध संघ किती दर देते? अशी विचारणाही त्यांनी केली. विश्वास जाधव, प्रवीण पाटील, प्रताप पाटील, जोतीराम घोडके यांनी मुद्दे उपस्थित केले.
मोर्चात ‘कागल’मधील आहेत ना?
आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन करताना शाैमिका महाडिक म्हणाल्या, चंदगडसह सर्वच तालुक्यातील दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले. ‘कागल’मधील उत्पादक यामध्ये आहेत ना? अशी विचारणाही त्यांनी केली.
विक्री दर वाढवून उच्चांकी खरेदी दरवाढ
मागील पाच वर्षात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आपल्या पारदर्शी कारभारामुळे म्हैस दुधाला १३ रुपये उच्चांकी दर दिल्याचा डांगोरा नेतेमंडळी पिटत आहेत. पण, विक्रीच्या दरात वाढ करुन खरेदी दर वाढवला, यामध्ये तुमचे योगदान कोणते? याचे उत्तर नेत्यांनी द्यावे, असेही महाडिक यांनी सांगितले.
डिबेंचर कपात ऐच्छिक करा
मुळात डिबेंचर कपातच रद्द करायला हवी. संस्थांच्या भल्याची काळजी तुम्ही करू नका. ज्यांना नको असेल त्यांचे डिबेंचर परत करा. याबाबत संपर्क सभेत पूर्वकल्पना देऊन निर्णय घ्यावा, असे महाडिक यांनी सांगितले.
‘गोकुळ’ मोर्चातील जनावरांसाठी खाद्याची सोय
जनावरांसह मोर्चा येणार म्हटल्यावर ‘गोकुळ’ने चारा, पशुखाद्यासह पाण्याची सोय केली होती. शेवटी या मुक्या जनावरांवरच आपला डोलारा उभा असल्याचे त्यांनी दाखवून दिले.