Kolhapur: शेतकरी संघात सर्वपक्षीय आघाडीचा एकतर्फी विजयी, सभासदांनी चिठ्ठीद्वारे नेत्यांवर सोडले टीकेचे बाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:23 PM2024-01-23T12:23:27+5:302024-01-23T12:24:16+5:30

नेसरीकर पॅनलला डिपॉझिट वाचवण्यात यश : सुमारे साडे नऊ हजार मतदान पॅनल टू पॅनल

One-sided victory of all-party alliance in farmers union kolhapur | Kolhapur: शेतकरी संघात सर्वपक्षीय आघाडीचा एकतर्फी विजयी, सभासदांनी चिठ्ठीद्वारे नेत्यांवर सोडले टीकेचे बाण 

Kolhapur: शेतकरी संघात सर्वपक्षीय आघाडीचा एकतर्फी विजयी, सभासदांनी चिठ्ठीद्वारे नेत्यांवर सोडले टीकेचे बाण 

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास’ आघाडीने एकतर्फी विजयी मिळवला. दोन बिनविरोध झाल्याने १७ जागा सरासरी ८,११७च्या मताधिक्याने जिंकल्या. सुमारे साडे नऊ हजार मतदान पॅनल टू पॅनल झाल्याने ‘बाबा नेसरीकर’ पॅनलच्या पाच उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभव पत्कारावा लागला.

शेतकरी संघाच्या १९ जागांपैकी इतर मागासवर्गीय गटातून सुनील मोदी व भटक्या विमुक्त जाती / जमाती गटातून राजसिंह शेळके बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १७ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात होते. पण, प्रत्यक्षात सर्वपक्षीय आघाडीच्या विरोधात केवळ पाच जणांच्या पॅनलने आव्हान दिले होते. एकास एक लढत नसल्याने रविवारी अवघे ३४ टक्के मतदान झाले होते.

सोमवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मोजणी झाली. अवघ्या अडीच तासात निकाल स्पष्ट झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, तर सहायक म्हणून सहायक निबंधक सुनील धायगुडे, मिलिंद ओतारी, नितीन माने, उदय उलपे यांनी काम पाहिले.

व्यक्ती सभासद :

विजयी शाहू आघाडी - अमरसिंह माने (१०,१०९), सर्जेराव देसाई (१०,०२६), अजित मोहिते (१०,०२५), दत्तात्रय राणे (९,९७३), जी. डी. पाटील (९,९४४), आनंदा बनकर (९,९१३), दत्ताजीराव वारके (९,७३५).
नेसरीकर आघाडी : यशोधन शिंदे - नेसरीकर (१,६१८), मुकुंद पाटील (१,३०९).
अपक्ष - आकाराम पाटील (७०७), जयसिंग पाटील (६५६), दत्तात्रय पाटील (५६९).

संस्था सभासद :
शाहू आघाडी
: आप्पासाहेब चौगुले (१२,१८१), सुभाष जामदार (१,२७९), प्रवीणसिंह पाटील (१,२७७), विजयसिंह पाटील (१,२७७), बाबासाहेब शिंदे (१,२७७), प्रधान पाटील (१,२६७), जयकुमार मुनोळी (१,२६६).
अपक्ष : सर्जेराव कानडे (७७), सुमित पाटील (८०).
अनुसूचित जाती / जमाती -

शाहू आघाडी : परशुराम कांबळे (११,३८३).
नेसरीकर पॅनल - सुभाष देसाई (९४८).
अपक्ष - प्रमोद कांबळे - (१६४)
महिला प्रतिनिधी -
शाहू आघाडी
- अपर्णा पाटील (११,२१६), रोहिणी पाटील (११,०४८)
नेसरीकर पॅनल - जान्हवी रावराणे (१,३६८), सुधा इंदुलकर (१,३६०).
इतर मागासवर्गीय - सुनील मोदी (बिनविरोध)
भटक्या विमुक्त जाती- राजसिंह शेळके (बिनविरोध)

शेतकरी संघाच्या उभारणीत नेसरीकर कुटुंबाचे योगदान सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला संघाबाहेर काढणारी नेते मंडळी कोण आहेत? सभासदांनी आम्हाला नाकारले, ठीक आहे. पण, पाच वर्षे संघाच्या कामकाजावर नजर ठेवून राहणार. - यशोधन शिंदे

जनतेला खुळ्यात काढू आणि आम्ही सगळं वाटून खाऊ, सभासदांच्या चिठ्ठीद्वारे भावना 

आपल्या सोयीसाठी कार्यकर्त्यांत ईर्षा पेटवून त्यांची डोकी फोडायची आणि तुम्ही गळ्यात गळे घालायचे. नेते हो हे तुमचे चांगले चाललेय. जनतेला खुळ्यात काढून जास्त काळ सोयीचे राजकारण करता येणार नाही, अशा शब्दांत शेतकरी संघाच्या निवडणुकीत सभासदांनी चिठ्ठीद्वारे नेत्यांवर टीकेचे बाण सोडले.

गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात सोयीचे राजकारण सुरू आहे. ‘गोकुळ’, ‘जिल्हा बँक’, बाजार समिती, बिद्री साखर कारखान्यानंतर आता शेतकरी संघाच्या निवडणुकीत प्रत्येक वेळी नेत्यांनी सोयीची भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांना झुंजवत ठेवले. त्याचा राग संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांनी चिठ्ठीद्वारे काढला. ‘संघ वाचवण्यासाठी सगळ्यांचे गळ्यात गळे आहेत, आता राहिलेल्या जागा तेवढ्या नावावर करून घ्या म्हणजे तुमचे सत्तेचे समाधान होईल’. ‘पूर्वी कर्मचारी व संचालकांनी संघाचा बैल बसवला, आता तुम्ही बैल उठवायला गेलात, उठवा, पण मारू नका’, अशा भावना सभासदांनी व्यक्त केल्या आहेत.

बंटीसाहेब, कानामागून आलेले तिखट झाले

‘बंटीसाहेब निष्ठावंतांना’ डावलू नका. कानामागून आलेले जरा जास्तच तिखट झाले आहेत, अशी खंत एका सभासदाने व्यक्त केली.

नरकेसाहेब वेळीच सावध व्हा..

चंद्रदीप नरकेसाहेब जिल्ह्यातील नेत्यांना तुमची गरज असेल तेव्हा बरोबर वापरून घेतात. वेळीच सावध व्हा, तुमची ताकद दाखवा, असे एका सभासदाने म्हटले आहे.

नेते हो ५० लाख ठेव ठेवा

संघ अडचणीत आहे, नेत्यांनी प्रत्येकी ५० लाख रुपये पाच वर्षांच्या मुदतीने ठेवावेत; पण संघाचा वापर स्वत:च्या राजकारणासाठी करणाऱ्यांना ही सुबुद्धी सुचणार नसल्याचा टोला एका सभासदाने लगावला आहे.

संघाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील शक्य

संघाच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली असून, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक प्रवीणसिंह पाटील, आमदार विनय कोरे यांचे समर्थक अमरसिंह माने, अजित मोहिते, जी. डी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत; पण पहिल्यांदा प्रवीणसिंह पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: One-sided victory of all-party alliance in farmers union kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.