Kolhapur: पाहुण्यांकडे आले अन् दुकानांमध्ये चोरी करून गेले; गांधीनगरातील चोऱ्यांचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:20 IST2025-10-31T18:18:38+5:302025-10-31T18:20:41+5:30
उल्हासनगरातील एकास अटक, चौघांचा शोध सुरू

Kolhapur: पाहुण्यांकडे आले अन् दुकानांमध्ये चोरी करून गेले; गांधीनगरातील चोऱ्यांचा उलगडा
कोल्हापूर : गांधीनगर येथे राहणाऱ्या पाहुण्यांना भेटण्याच्या निमित्ताने आलेल्या उल्हासनगरातील टोळीने कापड दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी रेहान रईस शेख (वय १९, रा. टिटवाळा वेस्ट, जि. ठाणे) याला अटक केली. या टोळीतील राजवीर संजूसिंग लाहोरी, प्रदीप रामबहाद्दर निशाद, अनिकेत यादव आणि सलमान अन्सारी (सर्व रा. उल्हासनगर) या चौघांचा शोध सुरू आहे.
दिवाळीची धामधूम सुरू असतानाच २४ ऑक्टोबरच्या पहाटे गांधीनगर येथील बाजारपेठेत चोरट्यांनी एका दुकानाचे शटर उचकटून एक लाख ७० हजारांची रोकड लंपास केली होती तसेच अन्य सात दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार राजू कोरे आणि अमित मर्दाने यांना ठाणे जिल्ह्यातील टोळीने चोरी केल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने उल्हासनगर येथे जाऊन रेहान शेख याला अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या चौकशीतून अन्य चौघांची नावे निष्पन्न झाली. मात्र, पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच त्यांनी पळ काढला.
रेल्वेने आले, एस.टी.ने गेले
या टोळीतील राजवीर लाहोरी हा दोन वर्षांपूर्वी एका मित्रासोबत त्याच्या पाहुण्यांकडे गांधीनगरमध्ये आला होता. पाहुण्यांकडे जाण्याच्या निमित्ताने तो मित्रांना घेऊन रेल्वेने गांधीनगरात पोहोचला होता. रात्रीत दुकाने फोडून ते एस.टी.ने परत गेले. अटकेतील शेख याच्याकडून पोलिसांनी चोरीतील ११०० रुपये आणि एक मोबाइल असा १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.