Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:48 IST2025-07-25T11:46:56+5:302025-07-25T11:48:21+5:30
मुलीला उच्चशिक्षित बनविण्याचे वडिलांचे स्वप्न भंगले

Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video
भोगावती : कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कुरूकली (ता. करवीर) येथे बसस्थानकावर एस.टी.ची वाट पाहत उभा असलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव कार (एमएच ०९ बीबी ५९०७) घुसली. यामध्ये प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८), अस्मिता अशोक पाटील (रा. कौलव), श्रावणी उदय सरनोबत (रा. कसबा तारळे) आणि श्रेया वसंत डोंगळे (रा. घोटवडे) या कारखाली सापडल्या. प्रज्ञाला कारने जवळपास शंभर मीटर फरफटत नेले. या घटनेत ती ठार झाली असून, अन्य तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
पळून जाणाऱ्या चालकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. चालक राशिवडे बुद्रुक येथील असून अल्पवयीन आहे. त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी अस्मिता अशोक पाटील हिने याबाबतची फिर्याद दिली. करवीर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थिनी आपापल्या गावी जाण्यासाठी कॉलेजपासून अर्धा किलोमीटरवर असणाऱ्या कुरुकली एस.टी. बसथांब्यावर एकत्र थांबलेल्या होत्या. यावेळी कोल्हापूरकडून राधानगरीकडे भरधाव निघालेली कार मुलींच्या घोळक्यात घुसली. यामध्ये चौघीजणी गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तातडीने १०८ ॲम्ब्युलन्समधून सीपीआर रुग्णालयात नेले. तेथे यांपैकी प्रज्ञा कांबळे हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले नंतर या तिघींना पालकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रज्ञाच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
जखमी अस्मिताची घरची परिस्थिती बेताची
गंभीर जखमी झालेल्या अस्मिता पाटील या विद्यार्थिनीची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आई रोजंदारी करत तीन मुलींचे शिक्षण पूर्ण करत आहे. अस्मिताच्या अपघाताने ती हतबल झाली आहे. आता अस्मिताच्या औषधपाण्याचा खर्चदेखील पेलवणार नाही, अशी परिस्थिती आहे.
प्रज्ञा वडिलांची लाडकी
मृत प्रज्ञा कांबळे ही वडिलांची अतिशय लाडकी होती. मुलीच्या शिक्षणासाठी वाटेल ते काम करून तिला उच्चशिक्षित बनवण्याचे त्यांचे स्वप्न या घटनेने भंगले.