कोल्हापुरातील अपघातात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 14:40 IST2019-05-21T14:23:10+5:302019-05-21T14:40:45+5:30
उद्यमनगरातील भारत बेकरी जवळ ऑटो रिक्षातून उतरुन कामावर पायी चालत जात असताना ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरातील अपघातात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू
कोल्हापूर - उद्यमनगरातील भारत बेकरी जवळ ऑटो रिक्षातून उतरुन कामावर पायी चालत जात असताना ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अमर आप्पासाहेब साळवी (वय 45 रा. शाहूपुरी 6 वी गल्ली) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (21 मे) सकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला. या अपघातानंतर भांबावलेल्या ट्रक चालकाने थेट राजारामपूरी पोलीस ठाणे गाठले. संशयित पांडुंरग विष्णूपंत हवालदार (42, रा. अतिवडे, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर साळवी हे सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घरातून चहा-नाष्टा घेऊन रिक्षातून उद्यमनगर येथील भारत बेकरीजवळील स्टॉपजवळ उतरले. तेथून ते एका दुकानाकडे पायी चालत जात होते. वाय पी. पोवारनगर चौकाकडून बिग बाजारकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (एम. एच. 11, एम. 5056) त्यांना बाजूच्या साईडने धडक दिली. त्यामध्ये साळवी पाठीमागील चाकाखाली अडकले. दहा ते पंधरा फुट फरफटत नेल्याने साळवी यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सकाळी फिरण्यासाठी रोडवर आलेल्या नागरिकांनी गर्दी केली.
नागरिकांची गर्दी पाहून ट्रक चालकाने राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मृत साळवी महापालिकेत कर्मचारी होते. परंतु ते अनेक वर्षापासून कामावर जात नव्हते. ते अविवाहित असून त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय असा परिवार आहे, अशी माहिती त्यांचे मित्र शोएब बाणेदार यांनी दिली आहे.