Navratri २०२५: पाऊसधारांच्या साक्षीने झाली अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:36 IST2025-09-27T16:33:55+5:302025-09-27T16:36:48+5:30
कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर, शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा मंगलमयी वातावरणात पार पडली त्र्यंबोली यात्रा

Navratri २०२५: पाऊसधारांच्या साक्षीने झाली अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट
कोल्हापूर : धो-धो कोसळणाऱ्या पाऊसधारांच्या साक्षीने शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई व सखी त्र्यंबोली देवीची हृदयभेट घडली. तोफेची सलामी, आरती, छत्रपतींच्या हस्ते कुमारिका पूजन, तिच्या हस्ते कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर, तुळजाभवानी, गुरुमहाराजांच्या पालख्या, शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा मंगलमयी वातावरणात त्र्यंबोली यात्रा पार पडली. भर पावसाच्या सरी झेलत भाविकांनी टेकडीवर उपस्थिती लावली.
शारदीय नवरात्रौत्सवात पंचमीला अंबाबाईची पालखी आपल्या शाही लवाजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. याचवेळी जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवी व छत्रपती शिवाजी महाराजांची, तसेच गुरू महाराजांची पालखी देखील रवाना होते. छत्रपतींच्या हस्ते पुजारी गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन होते. तिच्या हस्ते राक्षसरुपी कोहळा भेदनाचा विधी होतो.
शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. पाऊसधारा झेलत सकाळी १० वाजता अंबाबाईची पालखी मंदिरातून बाहेर पडली. भवानी मंडप, बिंदू चौक, उमा टॉकीज चौक मार्गे बागल चौकात आली. शाहू मिल परिसरात व राजारामपुरी मार्गे टाकाळा खण येथे विसावा घेण्यात आला. दोन्हीकडे धार्मिक विधी पडले. दुपारी पावणे एक वाजता अंबाबाईची पालखी त्र्यंबोली टेकडीवर आली.
वाचा : पंचमीनिमित्त कोल्हापुरातील अंबाबाईची अंबारीतील पूजा
त्र्यंबोली मंदिरात अंबाबाई व त्र्यंबोली देवीची भेट झाली, समोरील सभा मंडपात माजी खासदार संभाजीराजे, शहाजीराजे व यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते स्वरा गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. देवीची आरती झाली. त्यानंतर कुमारिकेच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा भेदनाचा विधी झाला. याविधीनंतर कोहळा घेण्यासाठी भाविकांची झटापट झाली. त्यानंतर मात्र वातावरण शांत झाले तुळजाभवानी व गुरुमहाराजांच्या पालख्या मार्गस्थ झाल्या. अंबाबाईची पालखी मात्र उशीरा निघाली. वाटेत भाविकांना भेट देत सायंकाळी पालखी मंदिरात परतली.
पावसामुळे तारांबळ.. गर्दी रोडावली
त्र्यंबोली यात्रेला दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी असते. कोहळा घेण्यासाठी मारामारी, पोलिसांचा लाठीमार असे प्रकार घडतात. यंदा मात्र पावसामुळे गर्दी कमी होती. त्यातही भाविक छत्री घेऊन उभे होते. दुपारी एक वाजता पावसाने जास्त जोर धरला. त्या पाऊसधारा झेलत भाविक अंबाबाईचा गजर करत होते.
रांगोळीऐवजी फुलांच्या पायघड्या
दरवर्षी अंबाबाईच्या पालखी मार्गावर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात यंदा पावसामुळे फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. वाटेवर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले जात होते. प्रसाद व सरबत वाटप सुरू होते.