Navratri २०२५: पाचव्या माळेला कोल्हापूरची अंबाबाई प्रकटली श्रीभुवनेश्वरी माता रूपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:28 IST2025-09-26T16:27:19+5:302025-09-26T16:28:09+5:30
भाविकांची अलोट गर्दी : पावसाची तमा न बाळगता घेतले दर्शन

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची भुवनेश्वरी माता रूपात पूजा बांधण्यात आली. शुक्रवार असल्याने मंदिरात भाविकांची दिवसभर प्रचंड गर्दी होती, पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती होती. दुपारपासून पडत असलेल्या पावसाची तमा न बाळगता लाखो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
भुवनेश्वरी माता विषयी
अरुणोदया प्रमाणे जिचा शरीर वर्ण असून, मुकुटावर जिने चंद्र धारण केला आहे. जी त्रिनेत्रयुक्त असून, प्रसन्नमुखी आहे, जिने आपल्या वरील दोन हातात, वरदहस्त व अंकुश तर खालील दोन हातात अभय व पाशयुक्त आहेत, अशी ही भुवनेश्वरी देवी आहे. ही पूजा श्रीपूजक लाभेश मुनिश्वर, मनोज मुनिश्वर, अविनाश मुनिश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
इतिहास
सृष्टी उत्पतीकाळी जेव्हा ब्रह्मदेवाने सोमाहुती द्वारा यज्ञ संपन्न केला, तेव्हा जी शक्ती षोडशीरुपात विद्यमान होती, तीच त्रिभुवनाचे रक्षण करू लागली आणि तीच ‘भुवनेश्वरी’ नावाने विख्यात झाली. तिलाच ‘राजराजेश्वरी’ देखील म्हणतात. ही चौथी महाविद्या असून, हिचा महादेव भैरव आहे, हिची भाद्रपद शु. १२ ला उत्पत्ती झाली, काली कुलातील ही देवता, पूर्वाम्नायपीठस्था आहे.
आदिशक्ती, भुवनेश्वरी, ज्येष्ठा, रौद्री, शताक्षी, स्मेरमुखी नावाने ती संबोधली जाते. हिच्या उपासनेने वाचासिद्धि, सौभाग्यवृद्धी, शत्रूपराजय, विजयप्राप्ती, षट्कर्मसिद्धि , सकल मनोरथासिद्धि आदी फले मिळतात.