Navratri २०२५: आठव्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाईची श्री महाकाली देवीच्या रूपात पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:50 IST2025-09-29T17:49:10+5:302025-09-29T17:50:57+5:30
आई अंबाबाईला तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने मानाचे महावस्त्र म्हणजेच साडी अर्पण करण्यात आली

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात आठव्या माळेला सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची श्री महाकाली देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. दरम्यान, सोमवारी दरवर्षीप्रमाणे आदिशक्ती पीठ म्हणून आई अंबाबाईला तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने मानाचे महावस्त्र म्हणजेच साडी अर्पण करण्यात आली.
दुपारी बाराच्या आरतीनंतर अंबाबाईची महाकाली रूपात पूजा बांधण्यात आली. हिचे मुख भीतिदायक असून, मुक्तकेशी, मुंडमाला धारण केलेली, चारहात असलेली डाव्या खालील हातात नुकतेच कापलेले नरमुंड व वरील हातात खड्ग उजव्या वरील हातात अभयदायी आशीर्वाद व खालील हात अभयमुद्रादर्शक आहे. सृष्टीचा लय करणे हे हिचे कार्य असून, सृष्टीच्या आरंभी हीच सर्वत्र व्याप्त होती. ब्रह्मदेवांनी मधु-कैटभांच्या वधासाठी श्री विष्णूंना जागृत करणेसाठी, योगनिद्रा महाकालीचीच प्रार्थना केली. तेव्हा विष्णूंच्या चेहरा, बाहू व हृदयातून हिचे तेज व स्वरूप प्रगटले. हीच महाकाली होय. अश्विन शुद्ध अष्टमीस हिची उत्पती मानली जाते.
ही पहिली महाविद्या असून, हिचा महाकाल भैरव आहे, आश्विन कृष्ण अष्टमीला हिची उत्पती झाली. ही कालीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. हिच्या उपासनेने बाधा निवारण, सुख सौभाग्य व ब्रह्मज्ञान प्राप्ती, पराक्रमप्राप्ती सर्वत्र विजयप्राप्ती, सकल वैभवप्राप्ती होते. दक्षिणकाली, स्मशानकाली, संततिप्रदाकाली, स्पर्शमणिकाली, चिंतामणिकाली, भद्रकाली, कामकलाकाली, हंसकाली हे हिचे प्रकार व उपसनाभेद आहेत.