Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:59 IST2025-06-14T18:57:34+5:302025-06-14T18:59:53+5:30
आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सामोरे जाणार

Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद
गडहिंग्लज: गेली २५ वर्षे मी जिल्ह्याच्या राजकारणात आहे.परंतु, राजकारणात नेहमी संघर्ष करावा लागतो. कुठल्यातरी 'पंचवार्षिक'ला सगळे माझ्यासोबत असतात, एखाद्या 'पंचवार्षिक'ला मी एकटा असतो. आता मी एकटा आहे, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना ? अशी थेट विचारणा करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद घातली.
'गोकुळ'च्या संचालिका अंजना रेडेकर यांच्या येथील निवासस्थानी आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व गडहिंग्लज कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रामदास पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, मल्लिकार्जुन आरबोळे, अजित बंदी आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सामोरे जाणार आहोत. गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता दलही आपल्या सोबत असणार आहे. यावेळी अंजना रेडेकर यांनी केदारी रेडेकर संस्था समूह आणि 'गोकुळ'च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अँड.दिग्विजय कुराडे यांनी प्रास्ताविक केले.अनिरूध्द रेडेकर यांनी आभार मानले.
'गोकुळ'मध्ये एकटे पडल्याची कबुली!
अलिकडेच झालेल्या 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले.त्यामुळे अध्यक्षपदाची संधी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नवीद मुश्रीफ यांना मिळाली आणि सतेज पाटील समर्थक निशिकांत पाटील - चुयेकर यांचे नाव मागे पडले.त्यानंतर 'गोकुळ'ची आगामी निवडणूक देखील 'महायुती'म्हणूनच लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यामुळे 'गोकुळ'च्या राजकारण ते एकटे पडल्याची चर्चा होती.त्याची कबुली स्वत: त्यांनीच यावेळी दिली.
गडहिंग्लजमध्ये 'ज.द'ही सोबत !
गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणुकदेखील महाविकास आघाडी ताकदीने लढवणार असून जनता दलही आपल्या सोबत असणार आहे,असे सतेज पाटील यांनी जाहीर केले.दरम्यान, बैठकीनंतर त्यांनी जनता दलाचे माजी उपनगराध्यक्ष नितीन देसाई,सागर पाटील यांच्याशीही गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.