‘उत्तर’ विधानसभा पोटनिवडणूक: भाजप येत्या बुधवारी अधिकृत उमेदवार जाहीर करणार; सहाजणांच्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:13 IST2022-03-14T17:03:37+5:302022-03-14T17:13:48+5:30
आज इच्छुकांच्या मुलाखती घेवून आजच याबाबतचा अहवाल प्रदेशकडे पाठवण्यात येईल. यानंतर तो दिल्लीला पाठवण्यात येईल. तेथूनच उमेदवारीची घोषणा करण्यात येणार

‘उत्तर’ विधानसभा पोटनिवडणूक: भाजप येत्या बुधवारी अधिकृत उमेदवार जाहीर करणार; सहाजणांच्या मुलाखती
कोल्हापूर : ‘उत्तर’ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. भाजपने ही पोटनिवडणूक लढण्याचे निश्चित केल्याने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपचा उमेदवार येत्या बुधवारी जाहीर केला जाईल अशी माहिती माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.
येथील एका हॉटेलवर आज, सोमवारी सकाळपासून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या दरम्यान हाळवणकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, माणिक पाटील चुयेकर, दौलत देसाई, सचिन तोडकर यांनी मुलाखती दिल्या.
पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी या मुलाखती घेतल्या.
हाळवणकर म्हणाले, आज इच्छुकांच्या मुलाखती घेवून आजच याबाबतचा अहवाल प्रदेशकडे पाठवण्यात येईल. यानंतर तो दिल्लीला पाठवण्यात येईल. तेथे उमेदवार निश्चित करून तेथूनच उमेदवारीची घोषणा करण्यात येणार आहे.