हेल्मेट घातलेत, चांगले केले, गुलाबपुष्प देऊन झाला सत्कार; कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ अभियान सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:56 IST2026-03-17T16:56:01+5:302026-03-17T16:56:49+5:30
तीन दिवस प्रबोधन मग कारवाई, न घातलेल्यांचा छायाचित्र देऊन सत्कार

हेल्मेट घातलेत, चांगले केले, गुलाबपुष्प देऊन झाला सत्कार; कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ अभियान सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर सोमवारपासून ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ अभियानाची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात पुढील तीन दिवस वाहनधारकांचे प्रबोधन केले जाणार आहे. किणी टोल नाका येथे राबविलेल्या मोहिमेत हेल्मेट परिधान केलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर हेल्मेट नसलेल्यांचे मी हेल्मेट वापरणार, अशा आशयाचा फलक त्यांच्या हाती देऊन छायाचित्र घेऊन प्रबोधन केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मोहिमेची सुरुवात केली.
‘हेल्मेट वापरा, जीवन वाचवा’ असा संदेश देण्यात आला. पहिल्या दिवशी २३२ वाहनांची तपासणी केली. २४ हेल्मेटधारकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर २०८ हेल्मेट नसलेल्यांचे मी हेल्मेट वापरणार, असा फलक देऊन छायाचित्र घेतले. त्यांना हेल्मेट का परिधान करावे, याची माहिती दिली.
एक हजाराची पावती..
दोन अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई केली जाणार आहे. हेल्मेट नसल्यास एक हजार रुपयांचा दंड केला जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.