करवीर जैसै थे, आठ गटांत बदल; कोल्हापूर जि.प., पंचायत समिती प्रारूप आराखड्यावरील हरकतींचा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:23 IST2025-08-13T12:23:12+5:302025-08-13T12:23:46+5:30

२२ ऑगस्टला अंतिम आराखडा

No change in Karveer, changes in eight groups Result of objections on draft plan of groups and groups in Kolhapur Zilla Parishad, Panchayat Samiti elections published | करवीर जैसै थे, आठ गटांत बदल; कोल्हापूर जि.प., पंचायत समिती प्रारूप आराखड्यावरील हरकतींचा निकाल 

करवीर जैसै थे, आठ गटांत बदल; कोल्हापूर जि.प., पंचायत समिती प्रारूप आराखड्यावरील हरकतींचा निकाल 

कोल्हापूर-कागल-चंदगड : कोल्हापूरजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील गट-गणांच्या प्रारूप आराखड्यावरील हरकतींचा निकाल मंगळवारी प्रसिद्ध केला असून, १३२ पैकी आठ (६ टक्के) हरकती स्वीकारल्या असून १२४ (९४ टक्के) हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या. यामध्ये हातकणंगलेतील सर्वाधिक ६८, करवीर तालुक्यातील ३९ हरकतींचा समावेश आहे.

मात्र, कागल तालुक्यातील पाच तर चंदगड तालुक्यातील तीन हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे कागल, चंदगडमधील आठ जिल्हा परिषद गटांमध्ये बदल होणार आहे. नव्या सुधारणांसह याचा प्रस्ताव १८ ऑगस्टला विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार असून, २२ ऑगस्टला अंतिम आराखाडा प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या १४१ हरकतींवर पुण्यातील विधान भवनामध्ये ५ ऑगस्टला सुनावणी झाली. त्याचा निकाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. त्यातील आठ हरकती दुबार होत्या. त्यामुळे १३२ पैकी ८ हरकती मान्य केल्या असून, १२४ हरकती फेटाळण्यात आल्या. प्रत्येक तहसीलदार कार्यालयाच्या सूचना फलकावर हरकतींचा निकाल लावण्यात आला.

जिल्हा परिषदेसाठी १२८ आणि पंचायत समितीसाठी १३, अशा एकूण १४१ हरकती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये हातकणंगलेत सर्वाधिक ६८ तक्रारी होत्या. करवीर तालुक्यातून ३९ तक्रारी होत्या. या सर्व हरकतींबद्दल त्या-त्या तालुक्यांच्या तहसीलदारांचे म्हणणे घेऊन त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अभिप्राय देऊन अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यानंतर हरकतदारांची सुनावणी घेऊन लेखी म्हणणेही घेण्यात आले होते.

बानगेऐवजी आता म्हाकवे जिल्हा परिषदेचा मतदारसंघ

नव्याने तयार केलेल्या बाणगे (ता.कागल) जिल्हा परिषद गट रद्द झाला असून त्याला म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ असे नाव मिळाले आहे. म्हाकवे गाव सिद्धनेर्ली मतदारसंघातून निघाल्यानंतर तेथे साके पंचायत समिती मतदारसंघ असणार आहे. पूर्वीच्या बानगे गटातील पिंपळगाव बुद्रुक व कसबा सांगाव गटातील शंकरवाडी ही गावे आता मौजे सांगाव पंचायत समितीऐवजी सिद्धनेर्ली पंचायत समिती गणात समाविष्ट केली आहे. हल्लारवाडी (ता.चंदगड) गावाचा समावेश माणगावऐवजी तुडये जिल्हा परिषद मतदारसंघात करण्यात आला आहे.

दृष्टीक्षेपात हरकती

  • एकूण हरकती: १३२
  • हरकती स्वीकारल्या : ८
  • हरकती अमान्य केल्या : १२४
  • कागलमधील ५ हरकती मान्य
  • चंदगडमधील २ हरकती मान्य, एक अंशत: मान्य

जिल्ह्यात १३३ पैकी आठच हरकती स्वीकारल्या जात असतील, तर यात निश्चित राजकीय हस्तक्षेप आहे. फेटाळल्या गेलेल्या सर्व हरकतींबाबत आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. -आ. सतेज पाटील, विधानपरिषद गटनेते, काँग्रेस.

Web Title: No change in Karveer, changes in eight groups Result of objections on draft plan of groups and groups in Kolhapur Zilla Parishad, Panchayat Samiti elections published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.