Kolhapur: फॉरेन्सिक ऑडिटशिवाय ग्रोबझमधील आरोपींना जामीन नाही; तातडीने ऑडिट करण्याचा सर्किट बेंचचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:28 IST2026-01-10T13:26:13+5:302026-01-10T13:28:31+5:30
जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ट्रेडिंग कंपनीने सुमारे २६ हजार गुंतवणूकदारांना २१८ कोटींचा गंडा घातल्याचा फिर्यादींचा दावा

संग्रहित छाया
कोल्हापूर : ग्रोबझ ट्रेडिंग फसवणुकीचा फॉरेन्सिक अहवाल आल्याशिवाय आरोपींच्या जामीन अर्जावर विचार केला जाणार नाही. पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक ऑडिट करून घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एन. व्ही. सूर्यवंशी यांनी दिला. शुक्रवारी (दि. ९) झालेल्या सुनावणीत तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपासाबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर केले तसेच जामीन मिळण्याची आशा मावळल्याने आरोपी विश्वास कोळी याच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला.
गुंतवणुकीवर कमी कालावधीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ट्रेडिंग कंपनीने सुमारे २६ हजार गुंतवणूकदारांना २१८ कोटींचा गंडा घातल्याचा फिर्यादींचा दावा आहे. याप्रकरणी पोलिसांनी केवळ १२ कोटींच्या फसवणुकीचे आरोपपत्र न्यायालयात सादर केल्याने सर्किट बेंचमधील तत्कालीन न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तपास अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यानंतर शैलेश बलकवडे यांनाही न्यायमूर्ती दिगे यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बलकवडे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायमूर्ती दिगे यांची बदली झाल्याने न्यायमूर्ती सूर्यवंशी यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायमूर्तींनी तपासाचा आढावा घेऊन फॉरेन्सिक ऑडिट करून घेण्याचा आदेश दिला तसेच ऑडिटचा अहवाल आल्याशिवाय आरोपींच्या जामिनाचा विचार होणारा नसल्याचे स्पष्ट केले.
फिर्यादींच्या वतीने ॲड. जयंत बारदेस्कर, ॲड. नकुल शुक्ल, ॲड. अहिल्या नलवडे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षामार्फत ॲड. राम चौधरी यांनी काम पाहिले. यावेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्यासह यापूर्वीचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे, पल्लवी यादव, शीतलकुमार कोल्हाळ, चेतन मसुटगे, आदी उपस्थित होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व्हीसीद्वारे उपस्थित होते.
वकिलांनी जामीन अर्ज घेतला मागे
गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट झाल्याशिवाय जामीन मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच आरोपी विश्वास कोळी याच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. या गुन्ह्यात एकूण १९ आरोपी आहेत. यातील नऊ जणांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला आहे. आठ जणांना अटकेनंतर जामीन मंजूर झाला. विश्वास कोळी आणि सोमनाथ कोळी हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
ऑडिटची प्रक्रिया सुरू
फॉरेन्सिक ऑडिटसाठी पोलिस महासंचालकांची परवानगी घेतली असून, ऑडिटर कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. लवकरच ऑडिटरची निश्चिती होईल. त्यानंतर ठराविक मुदतीत ऑडिटचे काम पूर्ण होईल. त्याचा अहवाल येताच फसवणुकीची नेमकी रक्कम स्पष्ट होईल, अशी माहिती तपास अधिकारी इंगळे यांनी दिली.