Kolhapur News: स्पेशल रुम, कॅफेत प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; निर्भया पथकाने छापा टाकताच उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:33 IST2025-12-06T14:33:34+5:302025-12-06T14:33:34+5:30
कारवाई होताच प्रेमीयुगुलांची भंबेरी उडाली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.

Kolhapur News: स्पेशल रुम, कॅफेत प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; निर्भया पथकाने छापा टाकताच उडाली खळबळ
इचलकरंजी: येथील झेंडा चौक परिसरातील एका कॅफेवर निर्भया पथकाने आज, शुक्रवारी छापा टाकला. कॅफेअड्डा असे त्या कॅफेचे नाव आहे. तेथे जोडप्यांसाठी स्पेशल रुम करुन देण्यात आल्याचे आढळले. या कारवाईत दोन प्रेमी युगुलांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी कॅफेअड्डाचा मालक संकेत शिवपुत्र हुबळे (वय २५ , रा.कोरोची) आणि व्यवस्थापक शैलेश अनिल चंदुरे (३६, रा.शेळके मळा) या दोघांवर गावभाग पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
या कॅफेत युवक, युवतींचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. शहरात कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निर्भया पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संभाजी भोजकर, व त्यांच्या पथकाने झेंडा चौकातील कॅफे अड्डावर छापा टाकला. कारवाई होताच महाविद्यालयीन प्रेमी युगुलांची तसेच कॅफेमधील जोडप्यांची भंबेरी उडाली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.
कारवाईमध्ये कॅफेत सुरू असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी दोन वेगळ्या स्पेशल रुम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी सोय तसेच बाकडे यांचीही सोय करण्यात आल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईची माहिती समजताच शहरातील अनेक कॅफे चालकांनी व्यवसाय बंद ठेवले तर पोलिस ठाण्यातही कॅफे चालक तसेच समर्थक यांची गर्दी झाली होती. ही कारवाई उपनिरीक्षक संभाजी भोजकर, पोकॉ सिराजभाई, महादेवी पुजारी, प्रियंका चौगुले, सिध्दांत शेटे आदींच्या पथकाने केली.