घरी एकट्याला सोडून आई कामावर गेली, मुलगा खासगी वाहन चालकाकडे लिफ्ट मागून कोल्हापुरात आला, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:32 IST2025-10-18T17:31:16+5:302025-10-18T17:32:40+5:30
हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जर

घरी एकट्याला सोडून आई कामावर गेली, मुलगा खासगी वाहन चालकाकडे लिफ्ट मागून कोल्हापुरात आला, अन्..
कोल्हापूर : घरी एकट्याला सोडून आई कामावर गेल्यानंतर हातकणंगले येथून नऊ वर्षांचा मुलगा शुक्रवारी बेपत्ता झाला. तो दाभोळकर कॉर्नर येथे थांबून वाहनधारकाकडे लिफ्ट मागत असताना पोलिसांच्या निदर्शनास पडला.
पोलिसांनी तातडीने त्याला शाहूपुरी पोलिसात आणले. समाज माध्यमातून आवाहन केल्यानंतर त्याच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात शहर पोलिस उपधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी त्या मुलास मिठाई देऊन आईच्या ताब्यात दिले.
उपअधीक्षक पाटील म्हणाल्या, त्या मुलाच्या आईचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चनेगाव येथील आहे. कामानिमित्त आई चार वर्षांपूर्वी मुलास घेऊन हातकणंगले येथे आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने आई मुलाला घरी सोडून कामावर गेली होती. त्या दरम्यान, मुलगा घरातून बाहेर पडून हातकणंगले येथून खासगी वाहन चालकाकडे लिफ्ट मागून कोल्हापुरात आला. येथे पोलिसांना मिळाल्याने त्यांना सुखरूपपणे आईच्या ताब्यात दिले.
हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जर
घरातून बेपत्ता झालेल्या त्या मुलाच्या हातात स्मार्ट वॉच आहे. खिशात चार्जर आहे. अतिशय तल्लख बुद्दीचा आणि धाडसी असल्याने पोलिस आणि पत्रकार विचारतील त्या प्रश्नाची उत्तरे धडधडीत देता होता.