दुचाकीस्वारांचा त्रास होणार कमी.. 'शॉक अब्सॉर्बर'च्या नवीन डिझाईनला पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:23 IST2025-11-28T19:22:55+5:302025-11-28T19:23:29+5:30
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांचे संशोधन

दुचाकीस्वारांचा त्रास होणार कमी.. 'शॉक अब्सॉर्बर'च्या नवीन डिझाईनला पेटंट
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या दोन प्राध्यापकांच्या टू व्हीलर वाहनांच्या तांत्रिक सुविधाविषयीच्या पेटंटला इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस, लंडन (युनायटेड किंग्डम) यांनी मान्यता दिली.
इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. अनिसअहमद रियाजअहमद नदाफ आणि प्रा. तन्मय प्रसाद कुलकर्णी यांनी 'टू व्हीलर सस्पेन्शन सिस्टीम'मधील 'शॉक अब्सॉर्बरचे' नवीन डिझाईन तयार केले. सध्या वापरात असणाऱ्या शॉक अब्सॉर्बरपेक्षा प्राध्यापकांनी तयार केलेल्या अब्सॉर्बरचे वजन कमी आहे. खराब रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या नव्या संशोधनामुळे तयार होणाऱ्या शॉक अब्सॉर्बरमुळे ही समस्या लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. परिणामी, प्रवाशांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
प्रॉपर्टी ऑफिसमध्ये या पेटंटची नोंदणी झाल्यानंतर विविध परीक्षणे करण्यात आली. यशस्वी परीक्षणानंतर पेटंटला मान्यता देण्यात आली. या अभिनव संशोधनामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडणार असून, अधिक आरामदायी वाहनांची निर्मिती होईल. या संशोधनामध्ये अधिकच्या संधी शोधून त्याद्वारे उत्पादनाच्या स्तरावरील विविध शक्यता आम्ही पाहत आहोत, असे प्रा. नदाफ आणि प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राचार्य विरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांचे मार्गदर्शन मिळाले.