Kolhapur ZP: महापौरपद मिळाले, तरच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद; राष्ट्रवादीचा पवित्रा
By राजाराम लोंढे | Updated: February 17, 2026 17:48 IST2026-02-17T17:48:02+5:302026-02-17T17:48:33+5:30
महायुतीतील कुरघोडीवर काँग्रेसची नजर

Kolhapur ZP: महापौरपद मिळाले, तरच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद; राष्ट्रवादीचा पवित्रा
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपने दावा केल्यानंतर त्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले आहेत. कोल्हापूर महापालिकेत त्याच निकषानुसार महापौर पद द्या, मगच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद देता येईल. असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतला आहे. महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून, विरोधी काँग्रेस मात्र त्यावर नजर ठेवून आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक महायुतीमधील घटक पक्षांनी सोयीने आघाडी करून लढले. यामध्ये सर्वाधिक २० जागा जिंकत राष्ट्रवादीने मुसंडी मारत आपलाच अध्यक्ष होईल, असे जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या अगोदर झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक २६ नगरसेवक भाजपचे निवडून आले. तिथे भाजप व शिंदेसेनेला महापौरपदाची, तर इतर समित्यांमध्ये राष्ट्रवादीला संधी देण्याचा समझोता झाला. येथे महापौरपदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे; पण अद्याप भाजप-शिंदेसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही.
वाचा: आमच्याही १८ जागा, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला दावा
जिल्हा परिषदेच्या निकालापासून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे महापालिकेतील सत्तेच्या फॉर्म्युल्याची आठवण महायुतीतील नेत्यांना करून देत आहेत. रविवारी मंत्री मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यामध्ये त्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर भाजपने अध्यक्षपदावर दावा केल्यानंतर महापालिकेतील फॉर्म्युल्याची आठवण राष्ट्रवादीचे नेते करून देत आहेत. दहा-दहा महिने तिन्ही पक्षांना महापौरपदाची संधी द्यावी, असा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. महापौर दिले तरच जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची संधी भाजप, शिंदेसेनेला मिळू शकते, हे मात्र निश्चित आहे.
भाजपच्या अध्यक्षपद मागणीमागे कोण?
भाजपने अचानक पहिल्या सव्वा वर्षासाठी अध्यक्षपदावर दावा केला आहे. साधारणता ज्याची सदस्यसंख्या अधिक त्याचाच अध्यक्ष होणार हे सरळ गणित असताना भाजपच्या दाव्यामागे नेमके कोण आहे? याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
मानसी लोळगे परिवहन सभापती
महापालिकेत राष्ट्रवादीचे महापौर, स्थायी समिती व परिवहन सभापती या पदाचा आग्रह धरला आहे; पण स्थायी व परिवहन देण्याबाबत भाजप, शिंदेसेनेचे नेते तयार असल्याचे समजते. महापौरपदाबाबत अंतिम चर्चा झालेली नाही. त्यातील पहिले पद ॲड. मानसी लोळगे यांच्या रूपाने परिवहन सभापती दिले जाणार आहे.