Kolhapur: चंदगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची युती; पण नगरसेवकांवर यड्रावकरांचा राहणार अंकुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:41 IST2025-11-20T16:40:17+5:302025-11-20T16:41:04+5:30
Local Body Election: जिल्ह्यातील एकमेव आघाडी : ‘व्हीप’चा अधिकारही यड्रावकरांना

Kolhapur: चंदगड नगरपंचायतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची युती; पण नगरसेवकांवर यड्रावकरांचा राहणार अंकुश
राम मगदूम
गडहिंग्लज : चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व अखिल भारतीय काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून ते मैदानात उतरले आहेत. परंतु, या आघाडीची कायदेशीर सूत्रे संजय पाटील-यड्रावकर यांच्याकडे आहेत. त्यामुळे शाहू आघाडीतून निवडून येणाऱ्या नगरसेवकांवर यड्रावकर यांचाच अंकुश राहणार आहे.
भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांना नगरपंचायतीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर व गोपाळराव पाटील ही मातब्बर मंडळी एकत्र आली आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या चिन्हावरच लढण्याचा निर्णय आमदार पाटील यांनी घेतला आहे.
शिंदेसेनेतर्फेही नगराध्यक्षपदासह १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, शाहू आघाडीच्या विरोधात भाजप व शिंदेसेना एकत्र येण्याच्या हालचालीदेखील सुरू आहेत. परंतु, निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.
आगामी जि.प., पं. स. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले. त्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. त्याचीच पुनरावृत्ती ‘कागल’मध्येही झाली. त्यामुळे चंदगड पुन्हा चर्चेत आले, मात्र ‘चंदगड’च्या नगरसेवकांना यड्रावकरांचा ‘आदेश’ पाळावा लागणार आहे.
‘व्हीप’चा अधिकार यड्रावकरांनाच
‘चंदगड’मध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह काँग्रेसही एकत्र आली. परंतु, पक्षीय पातळीऐवजी आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परंतु, आघाडीची रीतसर नोंदणी ऐनवेळी शक्य नसल्याने यड्रावकरांच्या नोंदणीकृत आघाडीच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. भविष्यात उपनगराध्यक्ष / विषय समित्यांची निवड आणि एखाद्या विषयावर मतदानाने निर्णय घेण्याचा प्रसंग उद्भवल्यास नगरसेवकांना आघाडीचा ‘व्हीप’ बंधनकारक राहणार आहे. मात्र, ‘व्हीप’ बजावण्याचा अधिकार आघाडीचे अध्यक्ष यड्रावकर यांनाच आहे. आघाडीच्या नगरसेवकांना पक्षांतरबंदीचा कायदाही लागू आहे.
जिल्ह्यातील एकमेव आघाडी
- शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन झाली. याच आघाडीतर्फे राजेंद्र पाटील-यड्रावकर दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.
- जयसिंगपूर, शिरोळ व कुरूंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावेळीही आघाडीचे स्वतंत्र पॅनल आहे.
- चंदगड नगरपंचायतीच्या उमेदवारांनीही याच आघाडीचे ‘ए’ व ‘बी’ फॉर्म घेतले आहेत. त्यामुळे एकूण ४ नगरपालिकांची निवडणूक लढविणारी जिल्ह्यातील ही एकमेव आघाडी आहे.