Kolhapur Politics: भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:19 IST2025-11-11T14:17:47+5:302025-11-11T14:19:29+5:30
Local Body Election: चंदगड नगरपंचायतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले

Kolhapur Politics: भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफ
गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले , महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आणि जमणार नसेल तिथे आघाडी करायची असे ठरले आहे परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली तरी चंदगड नगरपंचायतीमध्ये भाजप राष्ट्रवादीशी बोलायला तयार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकाकी पडल्याने त्यांना आधार देणे आपली जबाबदारी आहे म्हणूनच, चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आघाडी केली आहे. ‘चंदगड’मध्ये राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील, शरद पवार गटाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढेही ते नक्कीच एकत्र राहतील : राजेश पाटील
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, आम्ही सत्ताधारी महायुतीमधील घटक आहोत. परंतु, आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून आजअखेर कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळेच पुरोगामी विचारांच्या शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनाही आपल्यासोबत येण्याची विनंती केली आहे. जि. प., पं. स. निवडणुकीतही हीच आघाडी कायम राहील.
शरद पवार यांची संमती घेऊनच आघाडीचा निर्णय: डॉ. नंदिनी बाभूळकर
डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची संमती घेऊनच आघाडीचा निर्णय घेतला आहे. यापुढे उणे-दुणे काढायचे नाही, असे एकमताने ठरले आहे. जि. प. व पं. स. निवडणुकीसाठीही एकत्र येण्याबाबत गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील नेते सकारात्मक आहेत. चंदगड नगरपंचायतीवर पुरोगामी आघाडीचा झेंडा नक्कीच फडकावू.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले
जि. प. व पं. स. आणि नगरपालिका निवडणुकीसाठी चंदगड विधानसभा मतदारसंघात 'राष्ट्रवादीचे दोन्ही गटांचे मनोमिलन! या मथळ्याखालील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ते खरे ठरल्याची चर्चा गडहिंग्लज विभागासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वाचा : 'चंदगड'मध्ये दोन्ही 'राष्ट्रवादीचे मनोमिलन' ?, राजेश पाटील-नंदिनी बाभूळकर पुन्हा एकत्र येणार!