पीक कर्जासाठी ‘राष्ट्रीयीकृत’चे ‘जनसमर्थ’; तर जिल्हा बँकांचे ‘ई-किसान’ पोर्टल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:39 IST2025-12-26T17:38:30+5:302025-12-26T17:39:01+5:30
विना शुल्क ऑनलाईन पीक कर्ज मिळणार

संग्रहित छाया
राजाराम लोंढे
कोल्हापूर : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज मिळावे, यासाठी शासनाने राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज मागणी आता ऑनलाईन करण्यात आली आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात तीन हजार कोटी पीक कर्ज वाटपापैकी २३०० कोटी थेट केडीसीसी बँक ही विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांकडे असणाऱ्या कर्जदारांनाच याचा लाभ होणार आहे. असे असले तरी आगामी काळात जिल्हा बँकांनाही याचा स्वीकार करावा लागणार असून, त्यासाठी नाबार्डने ‘ई-किसान’ हे पोर्टल तयार केले आहे.
शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने ‘जनसमर्थ पोर्टलद्वारे’ पीक कर्जाची मागणी करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, जिल्हा बँका विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याने तिथे या पोर्टलचा उपयोग होत नाही. पण, भविष्यात जिल्हा बँकांनाही या कर्ज वितरण प्रणालीचा वापर करावा लागणार आहे.
कसे असेल ‘ई-किसान’पोर्टल
शेतकरी विकास संस्थांना ऑनलाईन पीक कर्जाची मागणी करणार. त्यानंतर विकास संस्था जिल्हा बँकेकडे तो प्रस्ताव पाठवणार, त्याची स्फुटनी करुन बँक संबंधित शेतकऱ्याला मंजुरी देणार.
ॲग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांची कुंडली कळणार
पीक कर्ज देताना काही ठिकाणी एकाच गट नंबरवर दुबार कर्जाची उचल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्ज मिळणार आहे. मात्र, ॲग्रीस्टॅक मध्ये प्रत्यक्षात क्षेत्र किती? त्यावर बोजा कोणत्या वित्तीय संस्थांचा आहे? यासह संबंधित शेतकऱ्यांची कुंडली कळणार आहे.
विना शुल्क ऑनलाईन पीक कर्ज मिळणार
जनसमर्थ पोर्टलने शेतकऱ्यांना कमीत कमी कालावधीत कर्ज मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. कोणी पैसे मागितले तर थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यांची आहे समिती...
तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप
- एकूण वाटप - ३ हजार कोटी
- जिल्हा मध्यवर्ती बँक - २३०० कोटी
- राष्ट्रीयीकृत व इतर बँका - ७०० कोटी