एन. डी. पाटील यांच्याविषयी चुकीची माहिती पसरविणाऱ्या माथेफिरूवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:06+5:302021-05-23T04:25:06+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डाॅ. एन. डी. पाटील यांची प्रकृती उत्तम आहे. तरीदेखील त्यांच्याविषयी चुकीच्या ...

N. D. Strict action against Mathefiru for spreading false information about Patil | एन. डी. पाटील यांच्याविषयी चुकीची माहिती पसरविणाऱ्या माथेफिरूवर कडक कारवाई

एन. डी. पाटील यांच्याविषयी चुकीची माहिती पसरविणाऱ्या माथेफिरूवर कडक कारवाई

कोल्हापूर : महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डाॅ. एन. डी. पाटील यांची प्रकृती उत्तम आहे. तरीदेखील त्यांच्याविषयी चुकीच्या बातम्या पसरविल्या जात असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांनी शनिवारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांना निवेदन देऊन अशा माथेफिरू प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, असा आग्रह इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी धरला. असे प्रकार थांबले नाहीत तर शांत बसणार नाही, असा इशाराही दिला.

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, शेतकरी कामगार व दीन दलित, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्यभर जिवाचे रान करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई करणारे प्रा. डाॅ. एन. डी. पाटील यांनी रविवारी वयाच्या ९२ वर्षी कोरोनाला हरवले. तरुण पिढी कोरोनासमोर हात टेकत असतानाही प्रा. डाॅ. एन. डी. पाटील त्याला हरवू शकले; कारण त्यांची मूळ शरीरयष्टी उत्तम आहे. उभ्या आयुष्यात कायम कष्टाचे जीवन ते जगले आहेत. तसेच राज्यातील कष्टकरी जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्याबरोबर आहेत. आज त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे. तरीदेखील उपचार घेऊन आल्याच्या दिवसापासून सातत्याने त्यांच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. या सर्व प्रकाराचा पाटील यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांनाही त्रास झाला. अशा प्रकारची बातमी पहिल्यांदा दाखवून संभ्रम निर्माण करणाऱ्या संबंधित टीव्ही चॅनेलने दिलगिरी व्यक्त केली आणि या विषयावर पडदा पडला, तसेच सर्व कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.

मात्र, पुन्हा दोन दिवसांनी परत तशाच प्रकारे सोशल मीडियावर चुकीची बातमी पसरविली आहे. ही बाब अत्यंत खेदजनक व संतापदायक आहे. प्रशासनाने अशा माथेफिरू वृत्तीच्या लोकांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. परत अशा प्रकारे जर कोणी चुकीची बातमी पसरवली, तर त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, याची प्रशासनाने दखल घ्यावी व अशा माथेफिरू वृत्तीच्या लोकांवर वेळीच कारवाई करावी, असे विक्रांत पाटील-किणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Web Title: N. D. Strict action against Mathefiru for spreading false information about Patil