Kolhapur: ईडी आणि प्रॉपर्टीतून मुश्रीफ-समरजित यांचे डिल, संजय मंडलिक यांचे खळबळजनक भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:45 IST2025-11-21T15:44:25+5:302025-11-21T15:45:13+5:30
'आमच्या महिला उमेदवाराला आर्थिक आमिष दाखवून दबावाने माघार घ्यायला लावली'

Kolhapur: ईडी आणि प्रॉपर्टीतून मुश्रीफ-समरजित यांचे डिल, संजय मंडलिक यांचे खळबळजनक भाष्य
कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांना ईडीतून वाचण्यासाठी आणि समरजित घाटगे यांच्या कागलमधील वाड्याच्या जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी या दोघांची युती झाली आहे. कुणी राजकीय युती, कोणी तालुक्याच्या विकासासाठी युती आणि कोणी पुढच्या तडजोडीसाठी युती असे म्हणत असले तरी ईडी आणि प्राॅपर्टीतून हे डिल झाल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील जनता कोणालाही एकाकी पडू देत नाही. सदाशिवराव मंडलिक, राजू शेट्टी ही त्याची उदाहरणे आहेत. सकाळपासून १०० जणांचे फोन आले की कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण आम्ही दोन, तीन जागा घेऊन माघार घेणार असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. परंतु आमचा अपमान झालाय. आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा भावना कागलचे नागरिक व्यक्त करत आहेत.
मी तर मंडलिकांचा मुलगा आहे
या जिल्ह्यातील आमदारही आम्ही सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून प्रेरणा घेऊन राजकीय संघर्ष करत असल्याचे नेहमी सांगत असतात. मी तर त्यांचा मुलगा आहे. एकतर मी कोणाच्या कधी फाटक्यात पाय घालत नाही. पण संघर्ष आमच्या पाचवीलाच पूजला आहे. पण आता ही वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही लढायला तयार आहोत, असे मंडलिक यांनी सांगितले.
उमेदवार सुरक्षितस्थळी
वास्तविक अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला प्रचार करायची उत्सुकता असते. परंतु आम्ही आमचे उमेदवार सहलीवर नव्हे तर सुरक्षितस्थळी पाठविले आहेत. कारण आमच्या एक महिला उमेदवार बाहेर जायचे म्हणून कपडे आणण्यासाठी घरी गेल्या तर त्यांना आर्थिक आमिष दाखवून किंवा दबावाने माघार घ्यायला लावली. आमचे उमेदवार सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून आम्ही ही खबरदार घेतल्याचे मंडलिक यांनी सांगितले.