एक खून माफ ?--दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:46 PM2018-07-02T22:46:18+5:302018-07-02T23:04:21+5:30

A murder waiver? - Look at | एक खून माफ ?--दृष्टीक्षेप

एक खून माफ ?--दृष्टीक्षेप

Next

चंद्रकांत कित्तुरे -

मोबाईलमधील कॅमेराचा ज्याने शोध लावला आहे, त्याचा मला खून करायचा आहे. हा खून मला माफ करावा, अशी विनंती आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याची टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे. त्यांची ही टिप्पणी मिष्कील असली तरी सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. कारण आधुनिक युगातील मोबाईलचा शोध आणि त्यातील कॅमेऱ्याच्या शोधाने तंत्रज्ञानात तसेच मानवी जीवनात क्रांती घडवून आणली आहे. त्याचे फायदे अनेक असले तरी तोटेही बरेच आहेत. राज ठाकरे यांना आपल्या मोबाईल कॅमेºयात टिपण्यासाठी धडपडणारी गर्दी पाहून त्यांनी ही टिप्पणी केली. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात कोणत्याही कार्यक्रमात असते.

विशेषत: एखादा सेलिब्रिटी पाहुणा असेल तर ही गर्दी अधिकच असते. प्रत्येकाला सेलिब्रिटीसोबत सेल्फी काढायचा असतो किंवा त्या कार्यक्रमाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून ठेवायची असते. तो क्षण त्याच्यासाठी आयुष्यातील एक अनमोल ठेवाही असू शकतो. मात्र, हे सर्व करताना आपण त्या कार्यक्रमाच्या रंगाचा बेरंग तर करत नाही ना? किंवा वेळ वाया घालवून कार्यक्रम लांबवत तर नाही ना? याचा विचार या मोबाईलधारकांनी करायला हवा, हेच राज ठाकरे यांना आपल्या या टिप्पणीतून सुचवायचे आहे. त्यांचा हा संकेत कितीजण विचारात घेतील हा प्रश्नच आहे शिवाय मनाला संताप आणणाºया इतर अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल असा विचार करायचा का? समाजाची मानसिकता कशी बदलणार?

मोबाईलबद्दलच बोलायचे झाले तर या मोबाईलने जगाला अक्षरश: वेड लावले आहे. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. एका आकडेवारीनुसार भारतात कोट्यवधी मोबाईलधारक आहेत. त्यातील बहुतेकांचा सोशल मीडियावर अनिर्बंध संचार असतो. भारताची लोकसंख्या एक अब्ज २० कोटी आहे. त्याच्या तिप्पट म्हणजेच तीन अब्ज ३० कोटी लोक जगभरात सोशल मीडियाचा वापर करतात. यातील दोन अब्ज २० कोटी लोक फेसबुक युजर आहेत तर एक अब्ज ५० कोटी लोक युट्यूब तितकेच लोक व्हॉटस् अ‍ॅपवरही सक्रिय आहेत तर ३३ कोटी लोक टिष्ट्वटरवर टिवटिवाट करत असतात. टिष्ट्वटरवरील लोकांची ही संख्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, त्रिपुराच्या लोकसंख्येएवढी आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांचा सर्व्हे एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आला त्याचा हा निष्कर्ष आहे. याचाच अर्थ सोशल मीडियाने मानवी विश्व किती व्यापले आहे हे दिसते.

मोबाईल आणि सोशल मीडियाने व्यक्ती-व्यक्तींमधील, नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे. कुठेही गेलात तरी प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलेला आपल्याला दिसतो. या मोबाईल सर्फिंगमुळे आपला कितीवेळ वाया जातो याचे भान कुणालाही नसते. असे असले तरी हाच सोशल मीडिया सध्या दुधारी शस्त्र बनला आहे. त्याचा जसा चांगल्या कामांसाठी वापर केला जातो तसाच एखादी अफवा किंवा गैरसमज पसरवण्यासाठीही वापर होतो. दोन वर्षांपूर्वी दोन देशांमध्ये क्रांती घडवून आणण्याची किमयाही याच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती.

एवढेच काय सन २०१४ च्या भारतातील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यातही या सोशल मीडियाचे मोठे योगदान होते. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी याचा मोठ्या प्रमाणात आधार घेतला आहे. कारण जनमत बनवण्यासाठी सोशल मीडियासारखे प्रभावी हत्यार नाही. याचवेळी जातीय द्वेष पसरविण्यासाठीही याचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करणाºयांविरुद्ध कडक कारवाईची तरतूद असणारा कायदा सरकारने केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ‘सायबर क्राईम’खाली गुन्हे नोंदवून खटले भरले जात आहेत तरीही सोशल मीडियाचा गैरवापर कमी होत असल्याचे दिसत नाही. मोबाईल कॅमेºयाने तर छायाचित्रकाराची गरजच जणू संपुष्टात आणल्यासारखे चित्र आहे शिवाय मोबाईलने काढलेल्या छायाचित्रांशी छेडछाड करून त्याचाही गैरवापर होत असल्याचे उघड झाले आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवणे मोठे आव्हान आहे. तरुणपिढीसह सर्वांनीच मोबाईल आणि सोशल मीडियाचा विधायक कामासाठीच वापर करावा, यासाठी प्रबोधन आणि कडक कायदा हेच खरे उपाय आहेत.

(लेखक लोकमतचे उपवृत्त संपादक आहेत)

(kollokmatpratisad@gmail.com)


 

Web Title: A murder waiver? - Look at

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.