Kolhapur Crime: जांभळीतील जिम ट्रेनरचा खून; हल्लेखोर गाडी, मोबाइल सोडून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:13 IST2026-01-29T15:13:38+5:302026-01-29T15:13:38+5:30
खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता

Kolhapur Crime: जांभळीतील जिम ट्रेनरचा खून; हल्लेखोर गाडी, मोबाइल सोडून पसार
शिरोळ : जांभळी (ता. शिरोळ) येथील जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील (वय ४४) यांचा बुधवारी रात्री नऊच्या सुमारास लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील जांभळी-जयसिंगपूर मार्गावर कुरडे मळ्याजवळ ही घटना घडली. दरम्यान, हल्लेखोरांचे चारचाकी वाहन व मोबाइल घटनास्थळी मिळून आले असून, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संदीप पाटील हे बुधवारी रात्री आपल्या मोपेडवरून जांभळी येथून जयसिंगपूरच्या दिशेने येत होते. ते कुरडे मळ्याजवळ पोहोचले असता, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हल्लेखोरांची चारचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत अडकली. गाडी बाहेर काढणे अशक्य झाल्याने हल्लेखोर चारचाकी गाडी आणि मोबाइल घटनास्थळीच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर आणि शिरोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याचे गूढ रात्री उशिरापर्यंत कायम होते. मिळालेल्या पुराव्याच्या आधारावरून पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.