महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य, कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापांखाली चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:17 IST2025-07-08T13:15:01+5:302025-07-08T13:17:59+5:30
उद्धवसेनेच्यावतीने वेगळेच आंदोलन

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य, कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापांखाली चिरडले
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांनी माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात आल्यावर चोप देऊ, असा इशारा देत उद्धवसेनेच्या वतीने गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापाखाली चिरडण्याचे वेगळेच आंदोलन सोमवारी (दि. ७) दुपारी येथे करण्यात आले. जिल्हाप्रमुख रवी इंगवले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
कोणाला किती भाषा येतात या विषयावरून शिंदेसेनेेचे आमदार गायकवाड यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल विधान केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धवसैनिक दुपारी एकत्र आले. यावेळी गायकवाड यांचे पोस्टर रस्त्यावर ठेवून त्यावर घोडा नाचवण्यात आला.
यावेळी इंगवले म्हणाले, छत्रपतींचा मानसन्मान वेशीवर टांगण्याचे धोरण शासनाने ठरवल्याचे दिसून येत आहे. यापुढे अशी वक्तव्ये थांबली नाहीत तर कोल्हापुरातून थेट टकमक टोक दाखवले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. विशाल देवकुळे, राजेंद्र जाधव, रवी चौगले, चंद्रकांत भोसले, दीपक गौड, राजेंद्र पाटील, धनाजी दळवी, विजय नाईक, दीपा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.