Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या कार्यक्रमात नरकेंचे फटके; मुश्रीफांचे मौन, सावध सतेज; भविष्यातील राजकारणावर सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:08 IST2025-03-31T16:07:44+5:302025-03-31T16:08:46+5:30
पत्रिकेवरील फोटोवर चर्चा; भविष्यातील राजकारणावर सूचक वक्तव्य

Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या कार्यक्रमात नरकेंचे फटके; मुश्रीफांचे मौन, सावध सतेज; भविष्यातील राजकारणावर सूचक वक्तव्य
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या पेट्रोलपंप उदघाटन व दूध उत्पादकांच्या सत्कार समारंभात आमदार चंद्रदीप नरके यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील फोटोवरून महायुतीमधील अस्वस्थतेवर जोरदार फटकेबाजी केली. याबाबत संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सबुरीने घेतले, तर आमदार सतेज पाटील यांनी सावध भूमिका घेत ‘गोकुळ’, जिल्हा बँकेत राजकारण विरहीत काम करण्याची तयारी दाखवली. तर, या सगळ्या गोष्टींना बगल देत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र मौन पाळले.
‘गोकुळ’च्या कार्यक्रम पत्रिकेवर पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे नाव उपस्थितांमध्ये घातल्याने त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा समारंभात सर्वच नेत्यांनी उल्लेख केला. पेट्रोलपंपाचे उद्घाटन करतानाच ‘त्या’ दोघांचे (प्रकाश आबीटकर व विनय काेरे) यांचे फोटो पत्रिकेवर का नाहीत? अशी विचारणा मंत्री मुश्रीफ यांनी अध्यक्षांकडे केली. यावर, प्रास्ताविकात अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, आमदार विनय कोरे दुबईत, तर पालकमंत्री प्रकाश आबीटकर हे मतदारसंघातील कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी कार्यक्रमाला येणार नसल्याचा निरोप दिल्याने त्यांचे फोटो छापले नाहीत.
सहकारात पक्ष नसतो, असे सांगत मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस रामनवमीला, तर आमदार सतेज पाटील यांचा हनुमान जयंतीला येत आहे. दोन्ही नेते आमचे ‘राम हनुमान’ आहेत. आगामी काळात दोघांनीही एकत्रीत राहून कारभार करावा, अशी अपेक्षा डोंगळे यांनी व्यक्त केली.
मंत्री मुश्रीफ यांचा आमचे मार्गदर्शक असा उल्लेख करत आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, मुश्रीफसाहेब आणखी एकवेळ आमदार होणार आणि त्यानंतर खासदार म्हणून दिल्लीत जाणार आहेत. त्यांची कुंडली दाखवली पाहिजे, कार्यक्षमता अफाट असल्याचा अनुभव आम्हीही घेतोय. त्यांनी आम्हालाही सोबत घ्यावे, त्यांच्याबरोबर आमदार म्हणून आम्हालाही काम करण्याची संधी मिळावी. राज्यात आणि जिल्ह्यात महायुती घट्ट आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आघाडीच्या नेत्यांनीही सुखाचा संसार करावा.
जिल्हा बँकेत राजकारण न आणता दहा गुंठ्याच्या शेतकऱ्याला म्हशीसाठी कर्ज दिले आहे. सहकारी संस्था राजकार विरहीत चालल्या पाहिजे. आगामी काळात जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ राजकारण विरहीत करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असे सतेज पाटील यांनी सांगून भविष्यातील राजकारणाबाबत सावध भूमिका घेतली.
डोंगळेंना दोघांना सांभाळायचं जमतं
अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा ‘कर्तबगार अध्यक्ष’ असा उल्लेख करत आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना कसे सांभाळायचे हे डोंगळे यांना चांगले जमते. आबाजी आपण मात्र त्यांच्याकडून हे शिकला नसल्याचा चिमटा ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना काढला.
सात रुपयांच्या मार्जिनमुळे तुम्ही निवांत
साखर कारखान्यांचे काही खरे नसल्याचे सांगत,‘गोकुळ’ला दूध विक्रीचे आगाऊ पैसे मिळतात, त्यात खरेदी व विक्री मध्ये प्रतिलिटर सात रुपयांचे मार्जिन असल्याने तुम्ही सगळे निवांत आहात, असा टोला नरके यांनी हाणला.
सर्वपक्षीय राजकारणाचे खासदारांकडून स्वागत
‘गोकुळ’च्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते दिसत आहेत, सर्वांना घेऊन जाणारा ‘गोकुळ’ असा चांगला संदेश जातो. विराेधक असले, तरी बरोबर घेऊन जाण्याची घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितले.