कोल्हापुरातील बेपत्ता तरुणी छत्तीसगडमध्ये सापडली, शाहूपुरी पोलिसांनी पकडून नातेवाइकांच्या ताब्यात दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:08 IST2026-03-24T12:08:14+5:302026-03-24T12:08:35+5:30
तरुणही सापडला, पोलिस ठाण्यात जमाव

कोल्हापुरातील बेपत्ता तरुणी छत्तीसगडमध्ये सापडली, शाहूपुरी पोलिसांनी पकडून नातेवाइकांच्या ताब्यात दिले
कोल्हापूर : लग्नाच्या आमिषाने एका तरुणासोबत निघून गेलेली शहरातील तरुणी छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये शाहूपुरी पोलिसांना सापडली. संबंधित तरुणासह दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. समुपदेशन करून तरुणीचा ताबा तिच्या नातेवाइकांकडे दिला. तरुण बेपत्ता असल्याची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल असल्याने त्याचा ताबा गांधीनगर पोलिसांकडे देण्यात आला.
शहरातील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची फिर्याद गुरुवारी (दि. १८) शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तिचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी नातेवाइकांसह काही संघटनांनी शाहूपुरी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव यांचे पथक छत्तीसगडकडे रवाना झाले होते.
मोबाइल लोकेशनवरून शोध घेऊन रविवारी रात्रीच बिलासपूरमधून पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तरुणाला ताब्यात घेतले. दोन दिवसांत दोन हजार ५२२ किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांचे पथक सोमवारी सायंकाळी कोल्हापुरात पोहोचले. पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
पोलिस ठाण्यात जमाव
ताब्यात घेतलेल्या तरुणीला आणि तरुणाला घेऊन पोलिसांचे पथक कोल्हापुरात दाखल होत असल्याची माहिती तरुणीचे नातेवाईक आणि सामाजिक संघटनांना मिळाली होती. संबंधित तरुणाला जाब विचारण्याच्या उद्देशाने संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. मात्र, पोलिसांनी संभाव्य धोका ओळखून आधीच तरुणाचा ताबा गांधीनगर पोलिसांकडे दिला. जमावाच्या समोरच तरुणीचा ताबा नातेवाइकांकडे देण्यात आला.