Kolhapur: बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर तपासाची फाइल पुन्हा उघडली, कॉल डिटेल्सपासून जबाबांपर्यंत पुनर्तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:51 IST2026-03-23T11:50:29+5:302026-03-23T11:51:03+5:30
तपासातील त्रुटींचा आढावा

Kolhapur: बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर तपासाची फाइल पुन्हा उघडली, कॉल डिटेल्सपासून जबाबांपर्यंत पुनर्तपास
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पाटगावचे बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या तपासाची फाइल एसआयटीकडून पुन्हा उघडण्यात आली. एसआयटी प्रमुख पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी तपासाची सूत्रे स्वीकारून अधिकाऱ्यांना कामांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. त्यानुसार आधीच्या तपासातील त्रुटींचा आढावा घेऊन पिळणकर यांच्या कॉल डिटेल्सपासून ते नातेवाइकांच्या जबाबांचाही पुनर्तपास केला जात आहे.
पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे ७ जानेवारी २०२६ रोजी गावातून बेपत्ता झाले. फिर्याद दाखल होताच भुदरगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांचा शोध घेतला. मात्र, बेपत्ता होऊन दोन महिने उलटूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाईक आणि काही सामाजिक संघटनांच्या दबावामुळे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी पिळणकरांच्या तपासासाठी एसआयटी तयार केली.
एसआयटीचे प्रमुख उपअधीक्षक इंगवले यांनी भुदरगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून आजवर झालेल्या तपासाचा आढावा घेतला. तपासातील त्रुटींवर चर्चा करण्यात आली. पिळणकर आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉल डिटेल्स तपासणे. संबंधित व्यक्तींची चौकशी करणे. त्यांचे नव्याने जबाब नोंदवणे. पिळणकरांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढणे अशा विविध कामांची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे वाटून देण्यात आली आहे.
पुन्हा पुराव्यांची जुळवाजुळव
पाटगाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. ग्रामस्थ पोलिसांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. पिळणकरांचा मोबाइल अद्याप सापडलेला नाही. पिळणकर बेपत्ता झालेल्या ठिकाणीही काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे पुन्हा पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. घटना घडून अडीच महिने उलटल्यामुळे तपासात काही अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक घेणार आढावा
तपासातील प्रगतीची माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना दिले आहेत. लवकरच तपासातील प्राथमिक माहितीचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तपासाचा आढावा घेणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.