Kolhapur ZP Election Results 2026: काँग्रेसला गती, पण सत्तेत महायुती; मुश्रीफांमुळे मिळाले बळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:36 IST2026-02-10T12:34:38+5:302026-02-10T12:36:20+5:30
आधीच्या कुस्तीनंतर आता दोस्ती, मुश्रीफ यांच्यामुळे महायुतीला बळ

Kolhapur ZP Election Results 2026: काँग्रेसला गती, पण सत्तेत महायुती; मुश्रीफांमुळे मिळाले बळ
समीर देशपांडे
कोल्हापूर : तब्बल पावणे नऊ वर्षांनी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीच्या एकूण ४१ विजयी उमेदवारांमधील निम्मे म्हणजे २० राष्ट्रवादीचे उमेदवार असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सत्तेमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. कोल्हापूर महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसचेही आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या क्रमांकाचे १४ उमेदवार विजयी ठरले आहेत.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, समरजित घाटगे यांच्या सामूहिक प्रयत्नातून जरी महायुती सत्तेजवळ गेली असली तरी आबिटकर, कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील यांना अपेक्षित यश न मिळाल्याने साहजिकच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागा वाढल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
आजऱ्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे
आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद दोन व पंचायत समितीच्या दोन जागा जिंकून राष्ट्रवादीने तालुक्यावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. पंचायत समितीमध्ये उद्धवसेना व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई हे पेरणोली गटातून, तर माजी उपसभापती शिरीष देसाई हे उत्तूर गटातून विजयी झाले.
राधानगरीत काँग्रेस सुसाट
राधानगरी तालुक्यात काँग्रेसचे ३, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीच्या दहा पैकी सहा जागा मिळवून काँग्रेसने सत्ता खेचून आणली. या निवडणुकीत के.डी.सी.सी. बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील हे काँग्रेससाठी तारणहार ठरले. या ठिकाणी झालेल्या पंचरंगी लढतीत भाजपच्या हाती भोपळा आला आहे. ए.वाय. पाटील यांच्याकडे गेली तीस वर्षे पंचायत समितीची सत्ता आहे. ती कायम राहिली आहे.
चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांना धक्का
जिल्हा परिषदेच्या चारपैकी माणगाव, तुडये, कुदनूर या तीन जागा व पंचायत समितीच्या आठपैकी माणगाव, तुडये, हेरे, तुर्केवाडी, कुदनूर या पाच जागा मोठ्या फरकाने जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार राजेश पाटील यांनी भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना दे धक्का देत त्यांच्या गडाला सुरुंग लावला. तर अडकूर गटातील दोन्ही पंचायत समितीसह तीन जागा व कोवाड गण राखण्यात भाजपला यश आले.
भुदरगडमध्ये महायुतीची सरशी
भुदरगड तालुक्यात दोन मंत्री आणि दोन माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली महायुती व महाविकास आघाडी यांच्यात रंगलेल्या दुरंगी लढतीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या महायुतीने निर्णायक बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या ४ पैकी ३ आणि पंचायत समितीच्या ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गारगोटीतून आमदार बजरंग देसाई यांच्या स्नुषा रेश्मा आणि पिंपळगावमधून प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या पत्नी रोहिणी दुसऱ्यांदा विजयी झाल्या.
शिरोळमध्ये यड्रावकरांची ताकद सिद्ध
आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. जि.प.च्या सातपैकी शाहू आघाडीला चार, महाविकास आघाडीला दोन तर भाजपला एका जागेवर यश मिळाले. शिरोळ पंचायत समितीच्या चौदा पैकी तब्बल दहा जागा जिंकून शाहू आघाडीने एकतर्फी सत्ता आणली आहे. या ठिकाणी यड्रावकर सर्वांना पुरून उरले.
करवीरमध्ये राष्ट्रवादी, भाजप युतीला यश
करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने मोठा पक्ष म्हणून उभारी घेतली असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपा यांच्या युतीमुळे काँग्रेसला बॅकफूटवर रहावे लागले. तर शिंदेसेनेची येथे मोठी पीछेहाट झाली. काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी एकतर्फी किल्ला लढवत ५ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती सदस्य निवडून आणले आहे. मात्र भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट युतीने सहा जिल्हा परिषद व १३ पंचायत समिती सदस्य निवडून आणल्याने युतीची ताकद दाखवली आहे.
कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे युतीला घवघवीत यश
जिल्हा परिषदेच्या सहाच्या सहा व पंचायत समितीच्या १२ पैकी ११ जागा चांगल्या मताधिक्याने जिंकत कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे व समरजित घाटगे यांच्या युतीने घवघवीत यश मिळविले आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांना दारूण पराभव पत्कारावा लागला. त्यातूनही त्यांचा एक पंचायत समिती सदस्य निवडून आला.
गगनबावड्यात सतेज पाटील यांचा एकतर्फी झेंडा
गगनबावडा तालुक्यातील दोन जिल्हा परिषदेसह सर्वच्या सर्व चार जागा पंचायत समितीच्या जिंकत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवला. विरोधी शिंदेसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवत गगनबावडा तालुक्यावर आपलीच मजबूत पकड असल्याचे आमदार पाटील यांनी पुन्हा सिद्ध केले.
गडहिंग्लजकरांची राजेश पाटील-नंदिनी बाभूळकरांना साथ
राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांना रोखण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार राजेश पाटील व डॉ. नंदिनी बाभूळकर यांना गडहिंग्लजकरांनी मनापासून साथ दिली. त्यामुळे तालुक्यात तब्बल १२ वर्षांनंतर राष्ट्रवादीला (अजित पवार) घवघवीत यश मिळाले. जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ४ आणि पंचायत समितीच्या १० जागांपैकी ८ जागा जिंकून राष्ट्रवादीने (अजित पवार) जोरदार कमबॅक केले आहे.
हातकणंगलेत महायुतीच भारी
हातकणंगलेमध्ये महायुतीने एकत्रित ताकद दाखवत जिल्हा परिषदेच्या ८, तर पंचायत समितीच्या १९ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. महायुतीच्या मुसंडीपुढे महाआघाडी चारीमुंड्या चीत झाली आहे. भाजपने १३ ठिकाणी कमळ फुलवले आहे, तर शिंदेसेनेचा करिश्मा शंभर टक्के यशस्वी झाला. जनसुराज्यच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने भगदाड पाडल्याने वारणा पट्ट्यात अनपेक्षित निकाल लागले आहेत. पंचायत समितीला भाजपने ११ जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.
शाहुवाडीत मतदारांचा दोन्ही आघाड्यांना समान कौल
शाहूवाडी पंचायत समितीवर सरूडकर - गायकवाड आघाडी व जनसुराज्य महायुतीस जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येकी दोन, पंचायत समितीच्या प्रत्येकी चार जागांवर यश मिळाले. महाविकास आघाडी व महायुतीस सम-समान संधी मतदारांनी दिली आहे. यामुळे सभापतिपदासाठी नेमकी वर्णी कोणाची लागणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
पन्हाळ्यात जनसुराज्यच्या सत्तेला सुरुंग
पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहापैकी तीन जागांवर राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि शिंदेसेना प्रत्येकी एका ठिकाणी आणि एक अपक्षांनी बाजी मारली आहे. पंचायत समितीत शिंदेसेना ४, राष्ट्रवादी ३ अशा सात जागा जिंकून जनसुराज्याच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. जनसुराज्यचे चार उमेदवार विजयी झाले असून, एका अपक्षाने बाजी मारली आहे.