Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:39 IST2025-07-10T16:38:40+5:302025-07-10T16:39:28+5:30

सहा तालुक्यांत नेत्यांना बळ देत जोरदार जोडण्या; शिंदेसेना, भाजप अजून शांत

Minister Hasan Mushrif begins resolution collection of Gokul Milk Association | Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर

Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर

समीर देशपांडे

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये ठरलेला डाव उधळल्यानंतर महायुतीचा अध्यक्ष म्हणून नविद मुश्रीफ पदावर बसताच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहावा ‘गिअर’ टाकला असून, पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांत नेते, शिलेदार कामाला लावले आहेत. अधिकाधिक ठराव संकलित करण्यासाठी जोरदार यंत्रणा त्यांनी उभी केली असून, तुलनेत शिंदेसेना आणि भाजपच्या गोटात शांतता दिसून येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून उठलेले राजकीय वादळ मुश्रीफ यांच्या पारड्यात अध्यक्षपद देऊनच शांत झाले. आमदार सतेज पाटील यांच्या पाठबळावर ‘सहकारात भाऊ भाऊ आणि इतर निवडणुकांत वेगळे राहू’ हा नाटकाचा प्रयोग पुढेच चालवण्याचे धोरण मुश्रीफ यांचे होते, परंतु भाजप, शिंदेसेनेने त्यांचा हा मनसुबा उधळून लावत त्यांच्या चिरंजीवांना अध्यक्ष करून ‘गाेकुळ’च्या येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जबाबदारी वाढवून ठेवली.

यापुढची निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची हे निश्चित झाल्यानंतर मात्र मुश्रीफ यांनी आपला पवित्रा बदलला आहे. जर महायुतीच्या आघाडीचे नेतृत्वच करायचे आहे आणि तिथे जर आपली प्रतिष्ठा पणाला लागणारच आहे, तर मग संस्थेत आपली माणसे अधिक हवीत आणि त्यासाठी ठरावांची ताकदच निर्णायक ठरू शकते याची जाणीव असणाऱ्या या नेत्याने जोडण्या घालायला सुरुवात केली आहे.

मुश्रीफ यांच्या वेगवान जोडण्यांच्या तुलनेत शिंदेसेना आणि भाजपच्या गोटात तूर्त शांतताच आहे. गेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून निवडून आलेल्यांपैकी केवळ शौमिका महाडिक याच शेवटपर्यंत तिथे विरोधक म्हणून सक्रिय राहिल्या. उरलेले सत्तारूढ आघाडीत कधी मिसळून गेले हे कोणालाच कळले नाही. या पार्श्वभूमीवर आता बदलत्या राजकीय परिस्थितीत शिंदेसेना आणि भाजपची रणनीती लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

‘होमपीच’वर सक्रिय

चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, भुदरगड आणि राधानगरी हे सहा तालुके म्हणजे मुश्रीफ यांचे ‘होमपीच’ असल्याने त्यांनी याच ठिकाणी आपले शिलकीतले डाव टाकायला आतापासूनच सुरुवात केली. परिणामी या सहाही तालुक्यांत ए. वाय. पाटील यांच्यापासून ते माजी आमदार राजेश पाटील यांच्यापर्यंत, के. पी. पाटील यांच्यापासून ते सतीश पाटील यांच्यापर्यंत सर्वांना त्यांनी या कामात गुंतवले असून, अधिकाधिक ठराव ताब्यात ठेवूनच चर्चेचा बसायचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे.

भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ

शिंदेसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे त्यांच्या त्यांच्या भागात ठराव गोळा करण्यासाठी खंबीर आहेत. आमदार अमल महाडिक दक्षिण कोल्हापूरमध्ये सक्रिय होतील, परंतु उर्वरित तालुक्यात भाजपकडून ठराव गोळा करण्यासाठी आदेश आणि बळ देण्याची चर्चासुद्धा सुरू नसल्याने भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

Web Title: Minister Hasan Mushrif begins resolution collection of Gokul Milk Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.