Kolhapur ZP President Election: पन्हाळगडावर बंद पाकीट फोडलं, शिल्पाताईंचं भाग्य उजळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:52 IST2026-03-18T11:52:35+5:302026-03-18T11:52:57+5:30
दोन भुदरगडकर, भाजप, शिंदेसेनेकडे अग्रेसर

Kolhapur ZP President Election: पन्हाळगडावर बंद पाकीट फोडलं, शिल्पाताईंचं भाग्य उजळलं
कोल्हापूर : सकाळी नऊ वाजून गेले होते. अजूनही अध्यक्षपदी कोण हे ठरले नव्हते. सदस्यांमध्येही घालमेल होती; कारण १० नंतर अर्ज भरायला पन्हाळ्यावरून कोल्हापूरजिल्हा परिषदेत जायचे होते. इतक्यात माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते पन्हाळ्यावर दाखल झाले. एका हॉटेलच्या एका हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांना एकत्र बोलावण्यात आले आणि पाटील यांनी पाकीट फोडून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘शिल्पा खोत’ यांचे नाव दिल्याचे सांगितले आणि खोत दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.
गेले काही दिवस सांगली आणि सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये भाजपला एकटे पाडण्याचे प्रयत्न झाल्याने भाजपनेही कोल्हापुरात ताणाताणी सुरू केली होती. त्यामुळे अध्यक्षपदाबाबतचा ‘सस्पेन्स’ वाढला होता; कारण मुश्रीफ हे सर्वाधिक सदस्यसंख्येच्या बळावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यासाठी आग्रही होते आणि भाजपही यातून काही साधते का या प्रयत्नात होता; परंतु अखेर रविवारी काही गोष्टी स्पष्ट झाल्या आणि अध्यक्षपद राष्ट्रवादीचकडे राहील, हे निश्चित झाले. तरीही सोमवारी महायुतीचे सर्व सदस्य संध्याकाळपर्यंत पन्हाळ्यावर दाखल झाले; परंतु अध्यक्षपदाचे नाव निश्चित झाले नव्हते.
वाचा: मुश्रीफ यांचे सब कुछ कागल, जिल्ह्याचे आणखी एक सर्वोच्चपद कागलकडेच
अखेर मंगळवारी सकाळी १० वाजता के. पी. पाटील, नविद मुश्रीफ, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आदिल फरास हे सर्वजण पन्हाळ्यावर आले. त्यांनी शिल्पा खोत यांचे नाव जाहीर केले आणि अर्ज दाखल करण्यासाठी त्या पन्हाळ्यावरून कोल्हापूरकडे रवाना झाल्या.
दोन भुदरगडकर, भाजप, शिंदेसेनेकडे अग्रेसर
एकीकडे राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर दुसरीकडे त्याआधीच सकाळी आठ वाजता भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अंबरीश घाटगे नेत्यांचा निरोप घेऊन पन्हाळ्यावर आले. त्यांनी भाजपच्या सर्व सदस्यांना उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांचे नाव नेत्यांकडून निश्चित झाल्याची माहिती दिली. शिंदेसेनेच्या सदस्यांना जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी झालेल्या निर्णयांची माहिती दिली. ११च्या सुमारास तानाजी पाटील हेही अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरात आले; तर एकनंतर उर्वरित सर्व सदस्य एका बसने कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले.