कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मिळणार हक्काचे घर, मंत्रालयात झाली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:49 IST2025-11-21T15:48:24+5:302025-11-21T15:49:22+5:30
घरे मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व समन्वयाने काम करण्याचे आदेशही दिले

कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांना मिळणार हक्काचे घर, मंत्रालयात झाली बैठक
कोल्हापूर : जिल्ह्यातील गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहेत. याबाबत गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या तसेच घरे देण्यासाठी कालबद्ध नियोजन करा, अशी सूचना केली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडा, नगरविकास विभागाचे अधिकारी, व जिल्ह्यातील गिरणी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, शासन निर्णयामुळे अनेक गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळाले आहे. उर्वरित कामगारांनाही लवकर घरे मिळावीत, एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहू नये. सेंच्युरी, एनटीसी व इतर गिरण्यातील कामगारांनाही लवकर घरे मिळावी यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून काम गतीने करण्यावर भर द्यावा.
ज्या गिरणी कामगारांनी शेलू (कर्जत) आणि कारव (ठाणे) येथील गृह प्रकल्पात संमती दिली आहे त्याची पुन्हा एकदा खात्री करावी. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीत चुकीचे लाभार्थी येऊ नयेत यासाठी संमतीपत्रांची पुन्हा पडताळणी करा. संबंधित विभागांना प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आणि गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने व समन्वयाने काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.